- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी एकाच जागेवर दोन-तीन उमेदवार इच्छुक आहेत, तर काहींनी आपल्या प्रभागात संधी मिळत नाही म्हणून पर्यायी प्रभाग शोधून त्या जागेवर उमेदवारी मागण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून विविध फंडे आजमावण्यात येत असून काही जण पक्षांतराच्या विचारात आहेत, तर अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले त्यावेळीच जवळपास चित्र स्पष्ट झाले होते. अपेक्षित प्रभाग न झाल्याने अनेकांना फटका बसला तर काहींना आरक्षण आडवे आले. तर कित्येक प्रभागात राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. उमेदवारी मिळाली नाही तर गेल्या काही वर्षांपासून केलेली कामे, घेतलेले कार्यक्र म, मेहनत आणि खर्च झालेले पैसे पाण्यात जातील, अशी भीती अनेकांच्या मनात डोकावत आहे. खांदा वसाहतीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये एक जागा खुल्या वर्गासाठी असल्याने तिथे शेकापकडून शिवाजी थोरवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र भाजपाकडून तीन ते चार जण इच्छुक आहेत. येथे संजय भोपी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इतर इच्छुकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. पंधरा वर्षांपासून नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले भीमराव पोवार यांच्या पत्नीला या प्रभागातून सर्वसाधारण महिला आरक्षित असलेल्या उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पोवारही याच प्रभागातून उमेदवारी हवी आहे. प्रभाग क्र मांक १४ मध्ये खांदा गाव, पनवेलचे मुस्लीम मोहल्ले, साईनगर, ठाणा नाक्याबरोबरच खांदा वसाहतीचे सेक्टर १३ आणि १४ हा परिसर येतो. या दोन सेक्टरमध्ये जवळपास चार हजार मतदार आहेत. खांदा वसाहतीतून भाजपाचे कार्यकर्ते श्रीहरी मिसाळ यांनी आपला व पत्नी सविता यांचा अर्ज भरला आहे. मिसाळ यांनी संपर्क कार्यालय सुरू करून परिचय पत्रके घरोघरी वाटले आहे. तसेच रिक्षांवर स्टिकर लावून प्रचार सुरू केला आहे. त्याचबरोबर पर्याय म्हणून त्यांनी प्रभाग ९ मध्ये सुध्दा निवडणूक लढविण्याची इच्छा अर्जाद्वारे व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये एकच जागा सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी आहे. त्यामुळे येथे शेकापकडून संदीप पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. आघाडी असल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील घरत यांना येथून निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी प्रभाग क्र मांक १८ पर्याय शोधला आहे. यामध्ये पनवेल शहराबरोबरच घरत ज्या ठिकाणी राहतात तो एचडीएफसी सर्कल, अंबिका आर्केड, फायरब्रिगेड हा नवीन पनवेलचा परिसर समाविष्ट आहे. येथे ओबीसी आणि सर्वसाधारण अशा दोन जागा आहेत त्यापैकी एका ठिकाणी नशीब आजमाविण्याचा संकल्प सुनील घरत यांनी बोलून दाखवला.नाराज उमेदवारांना सांभाळताना पक्षांची कसरतशेकापकडून प्रीतम म्हात्रे यांनी १९ ऐवजी १८ क्र मांकाचा पर्याय निवडला आहे. २००६ चा पनवेल नगरपालिका निवडणुकीतील निकालाचा अनुभव घेवून म्हात्रे यांनी हा पर्याय निवडला आहे. २००६ साली खांदा वसाहतीतून नगरसेवक झालेल्या सुनील नाईक यांचे आसुडगाव पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आले असून हे गाव कळंबोली, वळवली, टेंभोडे गावाला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे नाईक यांनी प्रभाग क्र मांक ९ चा पर्याय शोधला आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक आनंद भंडारी प्रभाग क्र मांक १६ मध्ये इच्छुक असून प्रभाग क्रमांक ९ मधूनही त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. बुधवार, १२ एप्रिल रोजी निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले असून इच्छुक आणि नाराज उमेदवारांना सांभाळण्याची मोठी कसरत सध्या शहरात सुरू आहे.