नवी मुंबई : वाहनचालकांना पोलीस असल्याची बनावणी करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत हा तोतया पोलीस बनवेगिरी करून लखपती झाल्याची बाब उघड झाली आहे. तो पुण्याला राहणारा असून लुटीच्या पैशातून त्याने कर्जत येथे फार्महाऊस बांधलेले आहे.पनवेल व उरण परिसरात वाहनचालकांना लुटल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून वाहनचालकांची अडवणूक करून त्यांना लुटले जात होते. अशाच प्रकारे कामोठे येथील प्रदीप मेंगडे यांना द्रोणागिरी येथे अज्ञाताने लुटले होते. पोलीस असल्याचे धमकावत सदर व्यक्तीने मेंगडे यांच्याकडून एटीएम कार्ड व पासवर्ड घेऊन ३४ हजार ५०० रुपये लुटले होते. अशा अनेक घटनांमुळे पोलिसांनी सदर परिसरात अनेकदा सापळे रचले. परंतु तोतया पोलिसाच्या मोटारसायकलीच्या वेगापुढे कोणाचाच टिकाव लागत नव्हता. अखेर युनिट २ चे वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ, साहाय्यक निरीक्षक बबनराव जगताप, साहाय्यक निरीक्षक किरण भोसले, सुभाष पुजारी, हवालदार सुनील साळुंखे, अनिल पाटील यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यामध्ये तोतया पोलीस पवन अरोरा (४०) हा खऱ्या पोलिसांच्या हाती लागला.पवन हा काही वर्षांपूर्वी नवी मुंबईत राहण्यासा होता. त्याचे वडील नेव्हीमध्ये कामाला होते. वडिलांच्या निधनानंतर त्याने पुण्याला स्थलांतर केले आहे. दरम्यानच्या काळात तो पनवेल, उरण परिसरात बतावणी करून वाहनचालकांना लुटायचा. परंतु कार व मोटारसायकल वेगात चालवण्यात तो माहीर असल्याने पाठलाग करूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला यापूर्वीही अटक झालेली असल्याचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी सांगितले. तर कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर सन २००७ पासून त्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना नव्हती. यादरम्यान गुन्हे करण्यासाठी तो पुणे येथुन नवी मुंबईत यायचा, असेही आयुक्त रंजन यांनी सांगितले. पवन अरोरा याच्या नावे कर्जतमध्ये ११ गुंठे जागेत फार्महाऊस आहे. पुण्यातून कारने फार्महाऊसवर येऊन तिथून मोटारसायकलवरून उरण परिसरात येऊन गुन्हे करून पळून जायचा. चौकशीत त्याने केलेल्या २८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. (प्रतिनिधी)
लखपती तोतया पोलिसाला अटक
By admin | Updated: March 17, 2016 02:29 IST