- नामदेव मोरे, नवी मुंबईनवी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये भाषण करू न दिल्यामुळे बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक राजकारण करून डावलण्यात आल्याचा आरोप केला असून महापालिकेवर हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला आहे. बक्षीस वितरणापेक्षा मानापमान नाट्यामुळे हा कार्यक्रम गाजला. नवी मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी घेतलेल्या गणेश दर्शन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव व क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करण्यासाठी गुरुवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, महापौर सुधाकर सोनावणे, खासदार राजन विचारे व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनाच भाषण करण्याची संधी देण्यात आली. बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना भाषण करू दिले नाही. यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेने कार्यक्रमाला बोलावून जाणीवपूर्वक अपमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापौर व पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कार्यक्रमस्थळी धारेवर धरले होते. पूर्वी विधान परिषद सदस्य असल्याचे कारण सांगून पालिका डावलत होती. निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतरही डावलण्याचे सत्र सुरूच आहे. हा निवडून दिलेल्या जनतेचा अपमान आहे. महापालिकेच्या या कृतीविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही नाराजी व्यक्त केली. बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये प्रथमच सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आले होते. राष्ट्रवादी सोडल्यानंतर जवळपास ८ वर्षांनी विजय चौगुले गणेश नाईक यांच्यासोबत व्यासपीठावर बसले होते. गत दोन वर्षांपासून मंदा म्हात्रे - नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. परंतु हे दोघेही या कार्यक्रमास उपस्थित होते. परंतु एकाच व्यासपीठावर आल्यानंतर हा कार्यक्रम बक्षिसांपेक्षा मानापमानामुळेच गाजला. भाषण करण्यास आमदार व विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली नाही. यानंतर बक्षीस वितरण करताना गणेश नाईक बक्षीस देताना शिवसेना व भाजपाचे नेते खुर्चीवर बसून रहात होते. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस देताना गणेश नाईक व राष्ट्रवादीचे पालिकेतील पदाधिकारी खालीच बसून रहात होते. यामुळे या सर्वांमधील मतभेद सर्वांच्या लक्षात आले. किमान गणेश दर्शनसारख्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तरी राजकारण केले नाही पाहिजे होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पूर्वी विधान परिषद सदस्य असल्यामुळे महापालिका सार्वजनिक कार्यक्रमात डावलत होती. आता विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही मतदार संघातील कार्यक्रमात भाषण करू दिले नाही. जे निवडणुकीत पडले त्यांना अधिक महत्त्व देण्यात आले. जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधींचा अपमान केल्यामुळे महापालिकेवर हक्कभंग दाखल करणार आहे. - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदार संघ
पालिकेला हक्कभंगाचा इशारा
By admin | Updated: September 12, 2015 02:20 IST