नवी मुंबई : प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या प्रेयसी पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चर्चेच्या बहाण्याने पत्नीला एनआरआय कॉम्प्लेक्सच्या मागे नेऊन गळा आवळून हत्या केली होती. अखेर आढळलेल्या मृतदेहावरून हत्येचा उलगडा करीत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.एनआरआय कॉम्प्लेक्सलगतच्या खाडीकिनारी मोकळ्या जागेत बुधवारी रात्री एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहालगतच सापडलेल्या पर्समधील ओळखपत्रावरून मयत महिलेचे नाव सविता नौकुडकर (३४) असे असल्याचे समजले. घटनेच्या दिवशीच सकाळी खारघर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पती राकेश नौकुडकर याने केली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पती राकेश याच्याकडे चौकशीला सुरुवात केली असता पोलिसांचा त्याच्यावरच संशय बळावला. मृतदेह सापडण्याच्या काही तास अगोदर त्याने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार खारघर पोलिसांकडे केल्यानंतर एनआरआय पोलिसांनाही यासंबंधीची माहिती दिली होती. यामुळे पोलिसांनी तपासाची सर्व सूत्रे त्याच्याच बाजूने वळवली असता, त्यानेच हत्या केल्याचे उघड झाले. यानुसार सबळ पुराव्यांच्या आधारे राकेशला अटक केली असून, त्यानेही गुन्ह्याची कबुली दिल्याचे साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांनी सांगितले.राकेश आणि सविता यांचा २०१२ मध्ये प्रेमविवाह झालेला असून, त्यांना दीड वर्षाचा एक मुलगा आहे. घरच्यांच्या विरोधात प्रेमविवहा करून काही दिवस वेगळे राहिल्यानंतर आर्थिक चणचणीमुळे तो पुन्हा वरळी येथील वडिलांकडे राहण्यास आला होता. त्याचे वडील मुंबई पोलीस दलात अधिकारी आहेत. परंतु पत्नी सविता व घरच्यांमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणाचा त्याला मनस्ताप होऊ लागलेला. याचदरम्यान एका मुलीसोबत प्रेमसंबंध जडल्याने तिच्यासोबत लग्नासाठी राकेशने सविताकडे घटस्फोट मागितला होता. परंतु सविताने घटस्फोटास नकार दिल्याने त्यांच्यातील वाद वाढला होता. अखेर ९ फेब्रुवारीला रात्री ७ वाजण्याच्या सुमारास त्याने एनआरआय कॉम्प्लेक्सलगत एकांतात पत्नीला नेऊन गळा आवळून हत्या केली. सविता खारघर येथे तर राकेश डोंबीवली येथे नोकरीला होते. त्यानुसार रोज सकाळी एकत्र मोटारसायकलवर निघाल्यानंतर पत्नीला वाशीत सोडून तो डोंबीवलीला जायचा. शिवाय रात्री घरी जाण्यासाठीही ते वाशीतच भेटायचे. घटनेच्या दिवशी चर्चेच्या बहाण्याने पत्नीला खारघर येथून सोबत घेऊन तो घटनास्थळी आला होता. तिथेही दोघांमध्ये घटस्फोटावरून भांडण झाले. त्यामध्ये राकेशने सोबत आणलेल्या वायरने गळा आवळून सविताची हत्या केली. त्याच रात्री मंदिरात जाऊन त्याने केलेल्या कृत्याची माफीही मागितली.
प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या
By admin | Updated: February 13, 2016 03:31 IST