पनवेल : संपूर्ण नवी मुंबई, पनवेलचे विहंगम असे दृश्य दिसणाऱ्या खारघर हिलवर किमान चार महिने तरी पर्यटकांना प्रवेश करता येणार नाही. पावसाळ्यात रस्ते खचणे, अतिवृष्टीमुळे झाडे रस्त्यावर तुटून पडणे, दरडी कोसळण्याच्या प्रकारांमुळे सिडकोने १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिडकोने हा निर्णय घेतला आहे. खारघर हिलच्या प्रवेशद्वाराजवळ सिडकोच्या वतीने सुरक्षा चौकी उभारण्यात आली आहे. दोन ते तीन सुरक्षारक्षक या ठिकाणी कार्यरत असतात. पावसाळ्यात खारघर हिलचे सांैदर्य आणखीनच खुलते. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र जमीन खचणे यामुळे मोठमोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होतात. काही वर्षांपूर्वी दोन पर्यटकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला होता. खारघरच्या सांैदर्यात भर घालत सिडकोने खारघर हिलची निर्मिती केली. सुमारे पाच किमीचा डांबरी रस्ता सिडकोने या ठिकाणी बनवला आहे. तसेच विजेची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचा फायदा या ठिकाणच्या आदिवासीवाड्या, चाफेवाडी व फणसवाडी यांना मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांचे जीवनमान सुधारले. खारघर हिलवर सकाळी, संध्याकाळी जॉगिंगसाठी येणारा वर्ग मोठा आहे. खारघर, सीबीडी बेलापूरमधील रहिवासी या ठिकाणी येत असतात. (प्रतिनिधी) काही जणांना सूटसुमारे चार महिने खारघर हिल पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये काही घटकांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये चाफेवाडी, फणसवाडी येथील रहिवासी, ग्रामपंचायत सदस्य, वन विभागाचे कर्मचारी, शाळेची गाडी तसेच शिक्षक आदींचा यामध्ये समावेश असल्याची माहिती खारघर हिलचे सुरक्षा पर्यवेक्षक एस. आर. शिंदे यांनी दिली.
खारघर हिलवर चार महिने प्रवेश नाही
By admin | Updated: June 16, 2016 01:20 IST