कल्याण : सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात तू तू मै मै होत असल्याने बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून ५ रुपये करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. महासभेची मंजुरी मिळताच हे नवे दर लागू होतील. त्यामुळे किमान टप्प्याचा प्रवास करणाऱ्यांना एक रुपयांचा दिलासा मिळाला असला तरी दूरच्या टप्प्यांचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला खार लागणार असल्याने प्रवाशांमध्ये कही खुशी, कही गम, असे वातावरण आहे.बसच्या २ कि.मी पर्यंतच्या प्रवासाचे भाडे ६ रूपयांवरून ५ रूपयांवर येणार आहे तर पुढील काही टप्प्यातील भाडयांमध्ये २, ४, ५ रूपयांनी वाढ होणार आहे. वेळोवेळी झालेल्या डिझेल दरवाढीच्या अनुषंगाने मागील १५ वर्षात ८ वेळा प्रवासी तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. ८ वी भाडेवाढ ५ जानेवारी २०१५ पासून लागू करण्यात आली.>>> परिवहनचा तोटा कमी?या भाडेवाढीनंतर सरासरी प्रवासी उत्पन्न १ कोटी ९० लाख असून महिन्याचा खर्च ३ कोटी १७ लाख होत आहे. हे पाहता परिवहन उपक्रमाला महिन्याला १ कोटी २७ लाख इतका तोटा सहन करावा लागत आहे. किमान भाडे सहा रुपये असल्याने सुट्टे पैसे देण्यावरून वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद निर्माण होत असत. तसेच बाजारात सुट्टया नाण्यांची चणचण मोठया प्रमाणावर भासत आहे. परिवहन समितीच्या बैठकीत फारशी चर्चा न करता सभापती नितिन पाटील यांनी प्रस्ताव मंजूर केल्याचे जाहीर केले. तिकिट दरात अशत: वाढ आणि सुसूत्रता आणणे जरूरीचे होते. यामुळे हा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केडीएमटीची छुपी भाडेवाढ
By admin | Updated: December 11, 2015 01:20 IST