नेरळ : कर्जत-कल्याण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. दोनच वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्राधिकरण महामंडळ यांच्याकडून नवीन रस्त्याचे चौपदीकरणाचे काम करण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कर्जत-कल्याण या मार्गावर कर्जतकडे येणारी बाजू काही प्रमाणात सुस्थितीत असल्याने वाहनचालक एकेरी वाहतूक करतात, परंतु काही वाहनचालक बेकायदा अतिवेगाने वाहन चालवत असल्याने या एकेरी वाहतुकीमुळे येथे अपघात होण्याची शक्यता असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.कल्याण- कर्जत-पळसदरीमार्गे मुंबई- पुणे महामार्गापर्यंत असलेल्या मार्गाचे दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्राधिकरणामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन चौपदीकरणाचे काम करण्यात आले होते. परंतु संबंधित खाजगी ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. कर्जत-कल्याण रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले होते यासाठी संबंधित ठेकेदाराने जलदगतीने काम उरकण्याच्या नादात दर्जाहीन निकृष्ट काम केले, यामुळे थोड्याच दिवसात रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली असून वाहन चालकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता रायगड आणि ठाणे अशा दोन जिल्ह्यांना जोडला असल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते.कर्जत - कल्याण राज्यमार्गावर दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने चौपदरीकरण केले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने या रस्त्यांवरील कर्जत ते शेलूपर्यंतचा भाग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर या रस्त्यावर कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरले होते. परंतु काही दिवसातच पुन्हा या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहने कशी चालवायची, असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक या रस्त्यावर एकेरी वाहतूक करत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. (वार्ताहर) कर्जतहून कल्याण-बदलापूरकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याने या लेनवरील रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. कर्जतकडे येणाऱ्या रस्त्याची स्थिती काही प्रमाणात ठीक असल्याने वाहन चालक एकेरी वाहतूक करत आहेत.परंतु काही वाहन चालक अतिशय बेकायदा वेगाने वाहन चालवत असून नियमित शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनांना तसेच दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. यासाठी पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढवून अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मानव विकास सामाजिक संस्था आणि नागरिकांची मागणी आहे. तसेच बांधकाम विभागाने या रस्त्यावर लवकरात लवकर दुरु स्ती करावी, अशी मागणी प्रवासी, वाहनचालकांकडून केली जात आहे.मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डेरोहा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कोलाड-खांब रस्त्याच्या दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे नेहमीच रहदारी असणाऱ्या या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जीव मुठीत घेऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात खड्डे भरण्यात आले होते. मात्र गणपतीनंतर कोकणात मुसळधार पाऊस दाखल झाल्याने पुन्हा मुंबई- गोवा महामार्गावर कोलाड व खांब परिसरात खड्डे पडले आहेत. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. या महामार्गावरून दिवसभरात हजारो प्रवासी प्रवास करत असतात. तसेच कोलाड या ठिकाणाहून धाटाव व विळा एमआयडीसी जवळ येत असल्यामुळे येथे जाणाऱ्या मालवाहू कंटेनर व अवजड वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. एकंदरीत अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कोलाड ते खांब दरम्यान महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. याचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातवरण पसरले आहे. तरी प्रवासी वर्गाला कायम डोकेदुखी ठरणाऱ्या व अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गावरील कोलाड ते खांब परिसरातील खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी कोलाड तेथील सामाजिक कार्यकर्ते शंकर महाबळे आणि पुई गावचे माजी सरपंच संजय मांडलुस्कर यांनी केली आहे.(वार्ताहर)
कर्जत-कल्याण राज्यमार्ग धोकादायक !
By admin | Updated: October 5, 2016 03:12 IST