- मधुकर ठाकूर,उरणदेशातील एकमेव तरुण आणि अत्याधुनिक अशीच जेएनपीटी बंदराची ओळख आहे. या बंदरातून देशाच्या एकूण ११ बंदरातील कंटेनर हाताळणीपैकी ५६ टक्के कंटेनर मालाची आयात-निर्यात केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात मोठा सहभाग असलेल्या जेएनपीटी बंदराने आता चौथ्या बंदराच्या उभारणीला प्रारंभ केला आहे. चौथ्या बंदराच्या उभारणीनंतर जेएनपीटी बंदरातून वर्षाकाठी एक कोटी कंटेनर मालाची हाताळणी होणार आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदराच्या प्रगतीचा आलेख आणखीनच उंचावणार आहे.जेएनपीटी बंदराची उभारणी २६ मे १९८९ साली झाली. २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बंदरावर आधारित छोटे- मोठे अनेक उद्योग उदयास आले आहेत. त्यामुळे परिसराचे झपाट्याने औद्योगिकीकरण झाले असून हजारो छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी विकासाची दालने सहजरीत्या खुली झाली आहेत. भविष्यातही कंटेनर आयात - निर्यात व्यापार वृद्धीसाठी जेएनपीटीकडून प्रयास केले जात आहे. यासाठी विविध योजनाही तयार केल्या जात आहेत.जेएनपीटी बंदराने आपल्या स्वत:च्या मालकीची दोन बंदरे या आधीच बहुराष्ट्रीय कंपन्यांना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर दिली आहेत. याला जोडूनच आता ५० लाख कंटेनर हाताळणीच्या क्षमतेचे चौथे बंदर उभारणीला जेएनपीटी बंदराने सुरुवात केली आहीे. यामुळे भविष्यात जेएनपीटी बंदरातून दरवर्षी एक कोटी कंटेनर मालाची आयात-निर्यात होणार आहे. बंदरात मोठमोठी मालवाहू जहाजे लागण्यासाठी समुद्र चॅनेलची खोली १४ मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे १० हजार कंटेनर क्षमतेची मालवाहू जहाजे बंदरात सहजगत्या बंदरात स्थिरावू लागली आहेत.बंदराच्या विकास कामात छोट्या मालवाहू जहाजांसाठी असलेल्या शॉलो वॉटर बर्थ जेट्टीची मोठी मदत मिळत आहे. जेएनपीटी बंदराच्या आसपास असलेल्या विविध सीएफएफएस, सीडब्लूसीचाही विकास करण्याच्या योजनांचाही त्यात समावेश आहे. गतवर्षी जेएनपीटी बंदरावर आधारित १०० हेक्टर क्षेत्रात विशेष आर्थिक विकास क्षेत्र उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. या योजनेची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
जेएनपीटी बंदर
By admin | Updated: October 6, 2015 00:49 IST