नवी मुंबई : महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून बांधलेली मार्केट धूळ खात पडून असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. करावेमधील मार्केटची पाहणी करून शक्य तितक्या लवकर सर्व मार्केटचा वापर सुरू करण्यात यावा, अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत. नवी मुंबईमधील नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने वाशीमध्ये मासळी मार्केट, नेरूळमध्ये भाजी मार्केट, सीवूडमध्ये मासळी व इतर व्यवसाय करण्यासाठी मार्केट, वाशीच्या वाहनतळावर व्यावसायिक गाळे, सीबीडीमधील वाहनतळावर व्यावसायिक गाळे व राजीव गांधी मैदानाच्या बाजूला भाजी मंडई बांधली आहे. या मार्केट बांधणीवर करोडो रूपये खर्च झाले आहेत. परंतु अनेक वर्र्षांपासून मार्केट धूळखात आहेत. लोकमतने ८ सप्टेंबरला सर्व मार्केटची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. महापौर सुधाकर सोनावणे यांनी शुक्रवारी करावे मार्केटची पाहणी केली. पहिल्या मजल्यावर जावूनही तेथील स्थिती पाहिली. आतमध्ये प्रचंड घाण व दुर्गंधी असल्याचे निदर्शनास आले. महापौर पाहणी दौऱ्यासाठी येणार असल्यामुळे मार्केट परिसराची साफसफाई सुरू केली होती. कचरा कुंडीभोवती कीटकनाशक पावडर टाकण्यात आली होती. रोडवर ठेवण्यात आलेले बांधकाम साहित्यही तत्काळ उचलण्यास सुरवात केली.
मार्केटची महापौरांकडून पाहणी
By admin | Updated: September 12, 2015 01:00 IST