ठाणे : बाळगंगा सिंचन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी हजर न राहणाऱ्या खत्री कुटुंबीयातील चौघांविरोधात ठाणे लाचलुचपत विभागाने वॉरंट काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य शासनाकडून बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर त्याबाबत ठाणे लाचलुचपत विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील प्रकल्पांची चौकशी सुरू केली होती. याचदरम्यान, या धरणाची कंत्राटदार फर्म मेसर्स एफ.ए. एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व त्यांच्या कुटुंबीय आणि जलसंपदा विभागातील तत्कालीन सहा अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. तसेच या वेळी एफ.ए. एंटरप्रायजेस या कंपनीने भागीदार निसार खत्री व इतरांनी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मकरीत्या झाल्या असल्याचे भासवून त्यांनी आर.एन. नायक आणि सन्स, हुबळी या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता, असे भासविले. त्याकरिता, त्यांनी निविदा प्रक्रियेसाठी आर.एन. नायक अॅण्ड सन्सच्या नावाने बनावट निविदा भरणे, या कंपनीसाठी एफ.ए. कं स्ट्रक्शनच्या बँक खात्यातून २५ लाखांचा इसारा रकमेचा डिमांड ड्राफ्ट देणे, बनावट लेटरहेडस् तसेच बनावट निविदेसाठी १ कोटी ५२ लाखांची बनावट बँक गॅरेंटी बनविणे असे प्रकार केले. हे करताना कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असताना, ती खरी असल्याचे भासवून टेंडर प्रक्रियेत भाग घेऊन केआयडीसीची व शासनाची फसवणूक केली. यासाठी एफ.ए. एंटरप्रायजेसचे भागीदार निसार फतेह मोहम्मद खत्री, फतेह खत्री, जैतुन खत्री, अबीद खत्री, जाहीद खत्री हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नसीरला अटक केली. तर अबीद व जाहिदला त्यांच्या वकिलांद्वारे निरोप पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र, ते हजर नसल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांनाच चौकशीसाठी हजर राहण्याबाबत वॉरन्ट काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
खत्री कु टुंबीयांविरुद्ध चौकशीचे वॉरंट
By admin | Updated: September 2, 2015 02:13 IST