कर्जत : नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना प्रस्तावित वाढीव घरपट्टी आल्याने कर्जतमधील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पूर्वी येत असलेल्या घरपट्टीच्या चार पट जास्त घरपट्टी आल्याने नगरपरिषदेच्या विरुध्द वातावरण चांगलेच तापले होते. याबाबत काही राजकीय पक्षाने आंदोलने केली आहेत. मात्र याबाबत नगरपरिषदेमध्ये चार वेळा नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळलेले अभ्यासू माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड यांनी नगरपरिषदेला काही सूचना लेखी स्वरूपात दिल्या आहेत यामुळे वाढीव घरपट्टी कमी होवू शकते असे मत व्यक्त केले आहे. त्या सूचनांचा विचार करावा अशी विनंती त्यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे. कर्जत नगर परिषदेने २०१५-१६ ते २०१९-२० करिता चतुर्थ वार्षिक प्रतिवर्षी कर मूल्यांकन नगरपरिषद अधिनियमाप्रमाणे देण्यात आलेल्या नोटिशीनुसार प्रस्तावित केलेली आहे, त्यामुळे मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढीमुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या प्रस्तावाचे अवलोकन केले असता असे निर्दशनास आले आहे की, २०१५-१६ ते २०१९-२० च्या दरांत १० टक्के दरवाढ देऊन निश्चित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. त्याकरिता अशी सूचना आहे की, २०१४-१५ साठी निश्चित केलेले दर कायम ठेवण्यात यावे व २०१५-२० साठी निश्चित केलेले दर कायम स्थिर ठेवण्यात यावे. २०१५-२० साठी प्रस्तावित केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्यात यावी तसेच घसारा वजावटीस इमारतीचे पूर्वमूल्य ६० वर्षे दर्शविले आहे, त्याची मर्यादा कमी करून ४० वर्षेपर्यंत करावी. त्यामुळे घसारा वजावटीस होणाऱ्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन त्याचा फायदा कर कमी करण्यासाठी होऊ शकेल. कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील कर्जत पूर्व क्षेत्र हे झोन १ मध्ये दर्शविले आहे, तसेच मुद्रे, दहिवली, भिसेगाव हे क्षेत्र झोन २ मध्ये दर्शविले आहे परंतु कर्जतमधील बहुतांशी क्षेत्र हे मुख्य बाजारापासून व रेल्वे स्टेशनपासून दूर आहे. तसेच त्या भागामध्ये झोपडपट्टी व बहुतांशी भाग अविकसित आहे. तरी या भागाचे पुन:सर्व्हेक्षण करून हा भाग झोन ३ मध्ये समाविष्ट करावा किंवा नव्याने झोन ४ नगरपरिषद क्षेत्रात वाढीव देण्यात येऊन त्याप्रमाणे प्रस्तावित दर आकारणी करण्यात यावी. यामुळे नवीन व जुन्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत दिसणारी तफावत किंवा फरक संपुष्टात येईल व नागरिकांचे गैरसमज दूर होतील.
कर्जतमधील वाढीव घरपट्टी कमी होऊ शकते
By admin | Updated: December 21, 2015 01:29 IST