नवी मुंबई : सिडको प्रशासन अनधिकृत बांधकामावर पक्षपातीपणे कारवाई करत आहे. शहाबाज गावातील रोडच्या जागेवर अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू असून १६ महिने पाठपुरावा केल्यानंतरही त्यावर काहीच कारवाई केली जात नाही. प्रत्यक्ष भेटून व ३० स्मरणपत्रे पाठविल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाचेच अभय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बेलापूरमधील शहाबाज गावाजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे. सेक्टर १९/२० मधील तारांगण व मधुस्वप्न या इमारतीच्या मागील बाजूला पूर्वी मोकळा रस्ता होता. सिडकोने जमीन संपादित करण्यापूर्वी सदर ठिकाणी मधुकर सोनटक्के या प्रकल्पग्रस्ताचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता. त्यासाठी शेड बांधले होते. परंतु सिडकोने ही जागाही संपादित केली होती. याच भूखंडावर व रोडची जागा एक्स ८, एक्स ९, एक्स १०, डब्ल्यू ५३ असे भूखंड आहेत. या भूखंडावर अनधिकृतपणे ६ ते ७ मजली इमारतीचे काम सुरू झाले आहे. बांधकाम सुरू झाले तेव्हाच सिडकोकडे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी तक्रार केली होती. परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी रोडच्या जागेवर बांधकाम केले जात असल्याची पहिली तक्रार जून २०१४ मध्ये करण्यात आली. त्यानंतर सातत्याने सिडको अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. आतापर्यंत ३० तक्रार अर्ज दिले आहेत. माहितीच्या अधिकाराचा वापर करून सदर भूखंडाचे वितरण केले आहे का याविषयी माहिती मिळविली. सिडकोने या भूखंडांचे वाटप केले नसून अतिक्रमणावर कारवाई केली जाईल असे लेखी स्वरूपात कळविले आहे. महानगरपालिकेनेही या बांधकामाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिडकोने ऐरोलीपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी जुन्या घराच्या जागेवर केलेले बांधकाम तोडले जात आहे. परंतु सिडको मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहाबाजमधील अतिक्रमणावर मात्र कारवाई होत नसल्याने सिडकोच अतिक्रमणांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होवू लागला आहे. बांधकाम परवानगी न घेता अधिकृत इमारतीला लागून बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. ये - जा करण्यासाठीचा रोड बंद केला असून सिडको यावर कधी कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे. अतिक्रमण असल्याचे मान्य करूनही कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांची संमती असल्याचा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)२००९ मध्येही तक्रार रोडची जागा बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने २००९ मध्ये अडविली होती. याठिकाणी अनधिकृत बांधकाम होण्याची शक्यता असल्याची तक्रार मे २००९ मध्ये सिडकोला केली होती. परंतु सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले. २०१४ मध्ये भूखंडाच्या बाजूला पत्रे लावून इमारतीचे बांधकाम सुरू केले. तेव्हापासून सातत्याने तक्रारी करून व प्रत्यक्षात भेटून कारवाईची मागणी केली तरी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने काहीच कारवाई केली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहाबाजमधील अतिक्रमणास अभय
By admin | Updated: December 18, 2015 00:38 IST