रोहा : तालुक्यात सर्वत्र होळी, धूलिवंदन उत्साहात साजरे होत असतानाच सोमवारी मध्यरात्री या उत्सवाला गालबोट लागले. सोमवारी मध्यरात्री १.३0 वाजण्याच्या सुमारास न्हावे गावात सणाच्या बंदोबस्ताला असणाऱ्या होमगार्डला दोघांकडून मारहाण करण्यात आली. या दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कर्तव्यावरील होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण करणे व जीवे ठार माण्याची धमकी देणे, शासनाचा परवाना न घेता ध्वनिप्रदूषण करणे, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेणवई येथे झालेल्या दुसऱ्या घटनेत एका महिलेला शिवीगाळ करणे, तिच्या घरावर दगडफेक करणे याप्रकरणी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.रोहे तालुक्यात सर्वत्र होळी, धूलिवंदन सण साजरे होत असताना आज सोमवार, मध्यरात्री दीडच्या सुमारास चणेराजवळील न्हावे गावातील तरूण मंडळी डीजेच्या गाण्याच्या तालावर नाचत होती. यावेळी बंदोबस्तासाठी नेमलेले होमगार्ड सुशील जगदीश गोमतांडेल याने डीजे बंद करण्यास सांगितले असता, सुनील रामदास पाटील व नितीन प्रभाकर पाटील यांनी त्याला शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण करून त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत आरोपी सुनील पाटील, नितीन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार असून पोलीस शोध घेत आहेत. तालुक्यातील चणेरा, गोफण, खारगांव, विरझोली, भालगांव, वाली, घोसाळे, रोेहे शहर, अष्टमी, धाटाव, किल्ला, कोलाड, सुतारवाडी, खांब, जामगांव, उडदवणे आदी शहर व ग्रामीण भागात अत्यंत शांततेत होळी आणि धूलिवंदन पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)
रोह्यात होळी सणाला गालबोट
By admin | Updated: March 15, 2017 02:35 IST