नवी मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत मेडिव्हिजन आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल आणि डेंटलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय मेडिव्हिजन २०१७ या विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळ येथील डी.वाय. पाटील संकुलात शुक्रवारी या परिषदेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेली तरतूद राज्यांमध्ये खर्च केली जात नसल्याचा आरोप केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी केला. निधी खर्च करा, आम्ही क्षमता वाढविण्यास तयार आहोत, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी या परिषदेकरिता नोंदणी तसेच विद्यार्थ्यांची मते, प्रतिक्रिया, शंका जाणून घेण्यात आल्या. शनिवारी यापरिषदेंतर्गत विविध कार्यशाळा तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता पद्मश्री डॉ. आर.डी. लेले तसेच प्रसिध्द वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मुफ्फजल लकडावाला यांची प्रमुख उपस्थिती होती. २०२५ सालापर्यंत आपला देश मधुमेहींचा देश म्हणून ओळखला जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाल्याची व्यथा डॉ. लेले यांनी मांडली. दररोज ४५ मिनिटे व्यायाम, सात्त्विक आहार, फळांचे सेवन तसेच रोजच्या आहारात गायीच्या तुपाचा समावेश करण्याचा सल्ला तरुणांना दिला. प्रसिध्दी आणि पैसा मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची निवड न करता रुग्णांची नि:स्वार्थ सेवा करणे हा उद्देश समोर ठेवून या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा मोलाचा सल्ला डॉ. लकडावाला यांनी दिला. भावी डॉक्टरांनी सेवा कार्य करावे या उद्देशाने शनिवारी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आह.े वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रतिभा आठवले (अहमदाबाद) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वैद्यकीय सेवेत गरजूंपर्यंत मदत कशी पोहोचविता येईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. समानांतर कार्यशाळेच्या माध्यमातून डॉक्टर-रुग्ण यामधील समन्वय या विषयावर टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.जान्हवी केदारे यांनी विद्यार्थ्यांना रुग्णावर उपचार करताना घ्यावयाची काळजी, रुग्णाशी संवाद साधणे, धीर देणे, सकारात्मक असणे किती आवश्यक आहे याचे मार्गदर्शन केले. दंतचिकित्सेच्या विद्यार्थ्यांकरिता स्माईल डिझायनिंग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल होते. या कार्यशाळेत सुप्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ.संदेश मयेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मेडिव्हिजनचे संयोजक रवी शुक्ला, चिंतन चौधरी, डी.वाय. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्याम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही केवळ संघटना म्हणून काम न करता समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचता यावे याकरिता नेहमी प्रयत्नशील असते. वैद्यकीय शिक्षणाकरिता विशेष धोरण आखण्याची मागणी या परिषदेंतर्गत केली जात असून त्याकरिता नक्कीच पाठपुरावा केला जाणार आहे. - विनय बिदरे, एबीव्हीपी, राष्ट्रीय महामंत्री.
आरोग्य निधी राज्याकडून खर्च होत नाही
By admin | Updated: April 23, 2017 03:51 IST