उरण : उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक बनल्या आहेत. धोकादायक ठरविण्यात आलेल्या घर मालकांना उरण नगरपरिषदेने नोटिसाही बजावल्या आहेत. त्यानंतरही या घरांमध्ये ४३ कुटुंब जीव मुठीत घेवून वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले आहे.धोकादायक ठरविण्यात आलेल्या घरांमध्ये बहुतांश कौलारू, एकमजली वाडे, घरे यांचाच सर्वाधिक समावेश आहे. पावसाळ्यात दिवसात धोकादायक असलेली घरे कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. संभाव्य अपघातापासून होणारी वित्त अथवा जीवित हानी टाळण्यासाठी इमारत, घरांभोवती सेफ्टी नेट आणि पत्र्याचे कुंपण घालण्याच्या सूचनाही उनपने केल्या आहेत. मात्र एकाही घर अथवा इमारत मालकांनी उनपने सूचनेप्रमाणे कार्यवाही केली नसल्याची माहिती उनपचे पर्यवेक्षक झेड. आर. माने यांनी दिली.बहुतांश धोकादायक घरे एकमजली अथवा बैठ्या चाळीच आहेत. या धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करीत असलेली बहुतांश कुटुंबे अनेक वर्षांपासून भाडोत्री म्हणून राहत आहेत. काही पगडी पद्धतीने तर काही ५० ते ५०० रुपये मासिक भाडे देवून अनेक वर्षांपासून राहत आहेत. अनेक घर मालक हयात नाहीत. त्यांच्या पश्चात असलेल्या वारसांना भाड्याने दिलेल्या घरांची दुरुस्ती करण्यात स्वारस्य नाही. भाडोत्र्यांची घरे, इमारत दुरुस्ती इच्छा असली तरी त्यासाठी घरमालक परवानगी देण्यास तयार नाहीत. केवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी आर्थिक सुबत्ता असतानाही अनेक भाडोत्री कुटुंब जीव मुठीत घेवून धोकादायक घरे, इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत. (वार्ताहर)
उरणमधील ४३ कुटुंबांवर टांगती तलवार
By admin | Updated: September 2, 2015 03:51 IST