आविष्कार देसाई, अलिबागशहरातील झगमगाट...तेथील लाइफ स्टाईल... आणि रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून दूरवर ३२ आदिवासी कुटुंब निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. रोज कष्ट करून जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. निसर्गालाच सर्वस्व मानणाऱ्यांना वैयक्तिक शौचालयाचे महत्त्व कसे असणार. मात्र कर्जत तालुक्यातील बोरीवली ग्रामपंचायतीमधील एका कर्मचाऱ्याला आदिवासींच्या मनात स्वच्छतेचे महत्त्व बिंबविण्यात यश आले. त्याने स्वखर्चाने सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधून दिली आहेत.बोरीवली ग्रामपंचायतीचे कर्मचारी नरेश भोईर असे त्यांचे नाव असून त्यांनी स्वच्छतेचे महान कार्य करीत सर्वांना एक आदर्श घालून दिला आहे. ३२ वैयक्तिक शौचालयांसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे त्यांनी तीन लाख ८४ हजार रु.खर्च केले आहेत. सरकारकडून त्यांना खर्च केलेली रक्कम परत मिळणार असली, तरी स्वच्छतेबाबत भोईर यांची सामाजिक जाणीव महत्वाची आहे. रामाची वाडी या आदिवासी वाडीवर ३२ कुटुंबे राहतात. त्यांच्याकडे वैयक्तिक शौचालये नव्हती. भोईर यांनी तेथील कुटुंबांना शौचालय आणि स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. सरकारच्या योजनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. स्वच्छता मिशनची टीम रामाची वाडी या आदिवासी वाडीवर पोचली. त्यावेळी आदिवासी बांधवांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सर्व आदिवासी कुटुंब स्वच्छतेच्या महान कार्यात सहभागी झाल्याबाबत त्यांचेही आभार मानले. सर्वांना पुष्पगुच्छ देऊन साळुंखे यांनी सत्कार केला. यावेळी जि.प सदस्य सुरेश पेमारे, अे. बी. थुळे आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचा कर्मचारी ठरला स्वच्छतादूत
By admin | Updated: December 21, 2015 01:32 IST