पनवेल : तालुक्यातील नेरेपाडा व आदई येथे दीड महिन्यापूर्वी महावितरणकडून नवीन विजेचे खांब देण्यात आले आहेत. मात्र हे खांब बसविण्यासाठी महावितरणला अद्याप मुहूर्त न मिळाल्याने तसेच पडून आहेत.ग्रामीण भागात बसवण्यात आलेले विजेचे अनेक खांब गंजलेले असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. काही खांब वाकले असून त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, गंजलेले खांब, जुनाट तारांमुळे अशा अनेक समस्यांना ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. याच संदर्भात १४ आॅगस्ट २०१५ रोजी झालेल्या आमसभेत विद्युत खांबांविषयी प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर आदई व नेरेपाडा गावात महावितरणकडून प्रत्येकी विजेचे २ खांब टाकण्यात आले. खांब आणून दीड महिना झाला तरी ते बसवण्यात आलेले नाही. अद्याप ताराही खेचल्या गेल्या नाहीत. दर मंगळवारी जवळपास ८ तास महावितरणकडून शटडाऊन घेतले जाते मात्र तरी देखील या दोन गावातील विजेचे खांब बसवायला महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नाही. एखादी दुर्घटना झाल्यावरच महावितरणला जाग येईल का, असा प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत आहे. (वार्ताहर)
वितरणला विजेचा खांब बसवायला मुहूर्त मिळेना
By admin | Updated: May 6, 2016 00:29 IST