पारोळ : महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नर्तिकांचे अश्लिल नृत्य ठेवून त्यांच्यावर दौलतजादा करण्याचा प्रकार माणिकपूर पोलीस ठाण्याच्या जवळ घडला असून फेरीवाला सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश तिवारी, उपाध्यक्ष सुधाकर सिंग, प्रभागर रामसिंग, विनोद तिवारी, स्पीकरचालक संजय मिश्रा व अश्लिल नृत्य करणाऱ्या दोन नर्तिका व पैशांची उधळण करणारे श्रीरतन जैस्वाल, अरविंद गुप्ता, रामानंद जैस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल केला.लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या समाजप्रबोधनाचे सत्व या घटनेवरून लयास जाताना दिसून आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाशी काहीही सोसरसुतक नसणाऱ्या उत्तर भारतीय समाजकंटकांनी गणेशोत्सवाचा बाजार मांडला. वसई पश्चिम येथील फेरीवाला सार्वजनिक मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून गुरूवारी रात्री १० वा. नर्तिकांची अश्लिल नृत्ये आयोजित केली. काही महाभागांनी तर गणरायाच्या साक्षीने त्या नर्तिकांवर पैशांची उधळण केली. काही वृत्तवाहिन्यांनी त्यांचे चित्रीकरण करून प्रसारीत केल्याने त्यांचा हा आंबटशौक जगजाहीर झाला व त्यांच्यावर पोलीसांनाही कारवाई करणे भाग पडले.वसई परिसरात गणेशोत्सवाच्या काळात अनेक मंडळे कार्यक्रम ठेवतात. परंतु त्यात मर्यादा पाळली जाते इथे ती साफ ओलांडली गेली. काही ठिकाणी तर जुगाराचे दिवसभर अड्डे सुरु असतात. पण त्यावर वसई तालुक्यात कारवाई होताना का दिसत नाही? हा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. (वार्ताहर)
गणेशोत्सवात अश्लिल नृत्य, बालांवर पैशांची उधळण
By admin | Updated: September 26, 2015 22:29 IST