देशावर दहशतवादाचे सावट असल्याने पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना खबरदारीच्या सूचना करूनही मंडळांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. गणेशोत्सव काळात समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सध्या देशावर दहशतवादाचेदेखील सावट आहे. यामुळे पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शिवाय प्रत्येक मंडळाला पोलीस सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याने सर्व मंडळांनी खबरदारी घेण्याच्याही सूचना केलेल्या आहेत. परंतु याचे गांभीर्य सार्वजनिक मंडळांकडून घेतले जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे.कळंबोलीतील बऱ्याच मंडळांनी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. राजे शिवाजी नगर रहिवाशी मंडळाबाबत बेफिकिरी असल्याचे उघड झाला आहे. २८ वर्षांची परंपरा असलेल्या मंडळातील बेवारस वस्तुकडे अर्धा तास उलटून गेला तरी कोणाचेच लक्ष गेले नाही. मंडळाने सीसीटीव्हींची व्यवस्था केलेली नाही आमचे कार्यकर्ते हिच आमची फौज असल्याचा मंडळाचा दावाही शनिवारी रात्री फोल ठरला आहे. लोकमत टीमने मंडपाच्या प्रवेशव्दाराजवळ एक गोणी ठेवली. मात्र अर्धा तास उलटून गेला तरी त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही त्याला अपवाद ठरले नाही. खारघर सेक्टर १८ मधील श्री गणेश मित्र मंडळाच्या आवारात संशयास्पद वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला असता याठिकाणी असलेल्या सतर्क कार्यकतर्यांनी त्वरीत विचारणा केली. लोकमतच्या प्रतिनिधींनी स्टिंग आॅपरेशनबद्दल माहिती दिल्यानंतर मनेश पाटील या कार्यकर्त्यांने मंडळाने सुरक्षेबाबत राबविलेल्या यंत्रणेची माहिती देत 3 सीसीटीव्ही मंडळाने बसविल्याचे सांगितले. याशिवाय भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठीही कार्यकर्ते नेमण्यात आल्याचे सांगितले. सीबीडी मधील काही गणेश मंडळांना भेट दिली असता या ठिकाणी येणा-या भाविकांचा सुरक्षेसाठी मात्र या मंडळाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे पाहायला मिळाले. सीबीडी मधील काही मंडळांच्या आवारात संशयास्पद बॅग ठेवण्यात आली. आजुबाजुला मंडळाचे कार्यकर्ते वावरत होते. दर्शनासाठी बाहेर भाविकांची रांग लागली होती. काही काळासाठी ती बॅग मंडळाच्या आवारात तशीच पडून होती मात्र तरीदेखील याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. विशेष म्हणजे मंडळांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी याकडे संशयास्पद दृष्टीने पाहिले नाही. काही वेळानंतर पुन्हा त्याठिकाणी फेरफटका मारल्यानंतर ती बॅग त्याच ठिकाणी आढळून आली. यावरुन सुरक्षेच्या बाबातील असलेला मंडळाचा निष्काळजीपणा समोर आला. १० दिवसांच्या उत्सावात दिवसागणिक शेकडो भाविक या मंडळांना भेट देत असतात असे असूनही या भाविकांच्या सुरक्षेकडे मात्र कानाडोळा केला जात असल्याचे पहायला मिळाले. सीबीडी बेलापुर परिसरात १५ पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेअसून वर्षानुवर्षे मंडळांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. उत्सव साजरा करताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाविकांची सुरक्षा याकडेच जर मंडळांनी गांभीर्याने पाहिले नाही तर एखादी जीवघेणी घटना घडू शकते. ब-याच मंडळांमध्ये दुपारच्या वेळेत गणेश मूर्तीजवळ कोणतेही कार्यकर्ते नसल्याचेही पहायला मिळाले. दुपारच्या वेळी मंडळाचे कार्यकते मंडपाबाहेर खुर्च्या टाकून निवांत बसलेले पहायला मिळतात. यावेळी येणा-या भाविकांकडे कोणाचेच लक्ष नसते अशा वेळेत कोणतीही अनोळखी व्यक्ती मंडळात शिरु शकते आणि यामध्ये एखादे दुष्कृत्याही घडू शकते. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरीत त्याची विचारपुस करण्यात यावी अशी सर्वच मंडळांना लोकमतच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रिकामा बॉक्स ठेवून बनवलेली बॉम्ब सदृश वस्तु कोपर खैरणे व घणसोली येथील काही मंडळात ठेवण्यात आली. मंडळात कार्यकर्ते व भाविकांची गर्दी असताना शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास हि चाचणी घेण्यात आली. त्यानुसार कोपर खैरणेतील एका मंडळाच्या दानपेटी लगतच हि पिशवी ठेवली. सुमारे १५ मिनिंटे हि पिशवी त्याच ठिकाणी असतानाही मंडळाच्या कार्यकर्त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते. यावरुन मंडळाच्या सुरक्षेतला हलगर्जीपना उघड झाला आहे. कार्यकर्त्याप्रमाणेच दर्शनासाठी येणारया भाविकांचाही हलगर्जीपना दिसून आला. येणारा प्रत्येकजन त्या बेवारस पिशवीकडे संशयाने पाहत होता. मात्र याची माहिती मंडळाला कळवण्याची तसदी त्यापैकी कोनीच घेत नव्हते. एका १० ते १२ वर्षीय लहाण मुलीने मात्र तिच्या पालकांना हि पिशवी दाखवली. परंतु पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करत तिला हाताला धरुन पुढे ओढत नेले.काही वेळाने हिच पिशवी मंडळाबाहेरच्या मेळ्यातील खेळण्यावर ठेवली. तिथे लहाण मुलांसोबत अनेक पालक आनंद घेत होते. परंतु अज्ञात व्यक्ती येवून संशयास्पद पिशवू ठेवून निघून जाते, हे पाहूनही कोनीच त्याचे गांभिर्य घेतले नाही. त्यानंतर रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास घणसोलीतील एका प्रसिध्द मंडळात गेल्यावर वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला. रहिवाशी वसाहतीमधल्याच या सार्वजनीक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकट्या गणेशमुर्तीवरच मंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवून घर गाठलेले होते. सुमारे ५ मिनिटाने काही तरूण त्याठिकाणी आले. मात्र त्यांनीही खुर्चीवरील बेवारस वस्तूची किंवा अनोळखी व्यक्तीची कसलीही चौकशी केली नाही. काही वेळाने हे तरुन देखिल मंडळाला वारयावर सोडून निघून गेले.तालुक्यात यंदा ५० हून अधिक मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असला तरी मंडळाच्या व भाविकांच्या सुरक्षेवर सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे टीम लोकमतने पनवेल, खारघर, कळंबोली आदी ठिकाणी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये जाणवले. पोलिस आयुक्तालयाच्या वतीने बैठका घेवून मंडळांना सुरक्षेसंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. यात सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांची नेमणूक आदी महत्त्वाच्या बाबीची पूर्तता मंडळांनी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक मंडळांचा भर सुरक्षेपेक्षा जाहिरातबाजीवर असल्याचे पहायला मिळाले. खारघर सेक्टर 15 मधील मंगलमूर्ती मित्र मंडळ दहा दिवसाचे गणेशोत्सव साजरा करीत आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मंडळाच्या प्रवेशद्वारासमोर टीम लोकमतने संशयास्पद पिशवी ठेवली. दहा मिनिटाच्या काळावधीत दोनचा पिशवीची जागा बदलली तरी मंडळाच्या एकाही कार्यकर्त्यांचे लक्ष गेले नाही. याठिकाणी सुरक्षारक्षकही नेमण्यात आला नव्हता. पनवेलमधील प्रभू आळीतील ओमकार मित्र मंडळातही एका खुर्चीवर संशयास्पद पिशवी ठेवण्यात आली. मात्र मंडळाचे कार्यकर्ते आपल्याच कामात गुंग होते. सुरक्षा रक्षक अथवा मंडळाच्या एकाही कार्यकर्त्यांचे याकडे लक्ष गेले नाही. तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये सुरक्षेच्या बाबतीत अशी बेफिकीरी समोर आली.
सुरक्षेबाबत गणेश मंडळे उदासीन
By admin | Updated: September 21, 2015 03:12 IST