लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम कागदोपत्री शेवटच्या टप्प्यात असून भूसंपादन केलेल्या रस्त्याच्या जागांचे पैसे अदा करण्याचे काम सुरु झाले आहे. महामार्गाची ठेकेदार कंपनी एल अॅण्ड टीने रस्ता मजबुतीकरणासाठी महामार्गावर धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली आहे. ठेकेदार कंपनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याने आणि पैसे वाटपाचे काम सुरु झाल्याने येत्या काही दिवसातच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु होईल असे चित्र दिसू लागले आहे.पनवेल ते इंदापूर हा मुंबई- गोवा महामार्गाचा पहिला टप्पा अतिशय संथगतीने पूर्ण होत असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामाला मुहूर्त कधी मिळणार याबाबत दक्षिण रायगड आणि कोकणस्थ जनतेला संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून शासकीय अधिकाऱ्यांमार्फत रस्त्यांची मापन भूसंपादन केलेल्या जागेच्या मालकांना नोटिसी या पातळीवर काम सुरु होते. मागील आठवड्यात भूसंपादन केलेल्या जागांचा मोबदला वाटप करण्यास प्रारंभ झाला. यानंतर रस्ता चौपदरीकरण निश्चित झाले असले तरी प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार या बाबतची शंका कायम होती. मात्र चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी ठेकेदार कंपनी एल अॅण्ड टीने मंगळवारपासून मुंबई-गोवा महामार्गावरील धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली. इंदापूर ते भोगाव या ४८ कि.मी. रस्त्यादरम्यान केंबुर्ली आणि भोगाव या दोन गाव हद्दीत कंपनीमार्फत ही चाचणी सुरु झाली आहे.इलेक्ट्रॉनिक पध्दतीचा वजन काटा वापरुन वजनी गाड्यांचे वजन करण्याचे काम केले जात आहे. प्रतिदिन ३०० गाड्यांची चाचणी अशी दोन दिवसात दोन ठिकाणी ६०० गाड्यांची चाचणी करण्यात आली. महामार्गावर धावणाऱ्या वजनी गाड्यांच्या प्रमाणात नवीन होणाऱ्या महामार्गाची क्षमता निश्चित केली जाणार आहे.मूळचा मुंबई-गोवा महामार्ग अरुंद असून केवळ ३५ टन क्षमतेकरिता तयार करण्यात आला होता. स्पाथ कंपनीतून आणि औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या गाड्या ३५ टनपेक्षा जास्त माल या महामार्गावरुन वाहतूक करत होत्या. मूळचा अरुंद रस्ता आणि क्षमतेपेक्षा अधिक (ओव्हरलोड) वाहतूक यामुळे महामार्गावरील खड्ड्यांचे संकट कधी दूर झालेच नाही. बुधवारी झालेल्या या चाचणीमध्ये ५१ टन वजनी गाड्या महामार्गावरुन धावत असण्याचे स्पष्ट झाले. ओव्हरलोड वाहतूक हा विषय महामार्ग पोलीस आणि आरटीओ या दोन खात्यांकडे येतो. महामार्गाची दुरुस्ती लक्षात घेता अशा ओव्हरलोड गाड्यांवर महामार्ग बांधकाम विभागाने देखील लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र या तिन्ही विभागाने कधीही अशा प्रकारे चाचणी करुन ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई कधी केलीच नाही. महामार्गाचा ठेकेदार कंपनी एल. अॅण्ड टी. ने बुधवारी केलेल्या चाचणीमध्ये महामार्गावरील ओव्हरलोड वाहतूक आरटीओ महामार्ग पोलीस आणि महामार्ग बांधकाम विभाग यांच्या निष्क्रियतेचे दर्शन घडवून दिले आहे.चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी ठेकेदार कंपनी एल अॅण्ड टीने मंगळवारपासून मुंबई -गोवा महामार्गावरील धावणाऱ्या वजनदार वाहनांची चाचणी सुरु केली.इंदापूर ते भोगाव या ४८ कि.मी. रस्त्या दरम्यान केंबुर्ली आणि भोगाव या दोन गाव हद्दीत चाचणी सुरु झाली आहे. महामार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी कंपनीमार्फत वजनदार गाड्यांच्या सर्व्हेचे काम सुरु आहे. या माध्यमातून नवीन होणाऱ्या रस्त्याची वजन सहन करण्याची क्षमता निश्चित केली जाईल, त्यानुसार पुढील काम सुरु करण्यात येईल. - संदीप शानबाग, सहाय्यक अभियंता एल.अॅण्ड टी. कंपनी मुंबई.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण : दुसरा टप्पा लवकरच
By admin | Updated: June 1, 2017 05:27 IST