नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस, भाजपा व काँगे्रसच्या उमेदवारांसह एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या या लढाईमध्ये शिवसेना व भाजपा एकत्र लढत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी १० जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. काँगे्रसने यावेळी पुन्हा नूतन दिगंबर राऊत यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, उपमहापौर अविनाश लाड, संतोष शेट्टी, दिगंबर राऊत यांच्या उपस्थितीमध्ये राऊत यांनी अर्ज भरला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने सरस्वती पाटील यांनी अर्ज भरला आहे . दारावेमधील नगरसेवक सुनील पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज भरला आहे. युतीच्या नेत्यांनी आमच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मतमोजणीमध्ये झालेल्या गोंधळामुळे गत निवडणुकीमध्ये या प्रभागातील यश थोडक्यात चुकले होते. आमचा उमेदवार प्रभागातील रहिवासी आहे तर युतीने बाहेरील उमेदवार दिला असून त्याचा नक्कीच फायदा होईल असे सांगितले. राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने शिल्पा कांबळे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. माजी खासदार संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, महिला अध्यक्षा माधुरी सुतार, उपस्थित होते. तीन प्रमुख पक्षांसह प्रतीक्षा चटणे यांनीही अर्ज भरला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.
पोटनिवडणुकीसाठी चार अर्ज
By admin | Updated: December 23, 2015 00:41 IST