घोडबंदर : नौपाडा, हरिनिवास चौक, तीनपेट्रोलपंप, अल्मेडा चौक, स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकादरम्यान वाय आकारात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्याला असलेला विरोध आता मावळण्याची शक्यता आहे. हा पूल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अडसर ठरणार असल्याचा दावा शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे तक्रार करून या कामाला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केली होती. याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाने या पूलाचे संकल्पचित्र, बांधकामाचे नकाशे तरे यांना सादर करून त्यामुळे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा शाबूत ठेवून हा पूल वाय आकारात बांधण्यात येत असल्याचे सष्ट केले आहे.गोल्डन डाइज नाक्यावरील घोडबंदर- भिवंडी-मुंबई या तिसऱ्या मार्गिकेचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या जे. कुमार कंपनीला नियोजित पुलाचे काम देऊ नये, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. नियोजित उड्डाणपुलाची परिस्थिती ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील (सॅटीस) पुलासारखी होऊन गोखले रोड त्यामुळे वाहतूककोंडीत दिवसभर सापडलेला असतो. विशेष म्हणजे येथे अग्निशमन दलाचा बंब जाऊ शकत नाही. तशी परिस्थिती स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकातही होऊ शकते. ही बाब तरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मीनाताई ठाकरे चौकात वाय आकारात उड्डाणपूल
By admin | Updated: September 2, 2015 03:38 IST