अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलासध्या श्रावण महिना सुरु आहे. हा महिना हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार साजरे केले जातात. याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, दहीहंडी, पतेती, पिठोरी अमावस्या, पोळा आदी सण येतात. सध्या श्रावण सोमवारमुळे फुलांना आणि हाराला मागणी वाढली आहे. यामुळे फुलांच्या दरात वाढ झाली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, खालापूर, रोहा, सुधागड, टाळा, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, महाड, पोलादपूर आदि तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सध्या श्रावणमासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये फुलांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. श्रावण महिन्यात पूजा, अभिषेक, होमहवन आणि अन्य धार्मिक विधी करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या बेल, फुले यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.फूल विक्रे त्या जयश्री पाटील यांनी श्रावण मासानिमित्त फुलांना मागणी वाढली आहे असे सांगितले. त्याचबरोबर फुलांच्या किमती देखील वाढल्याचे त्या म्हणाल्या. फुलांचे भाव वाढल्यामुळे हारांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. पावसाळ्यात माळा खराब होत असल्याने मोजक्याच माळा आणाव्या लागत असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. सध्या रायगडच्या अनेक फूलविक्रेत्यांसाठी पुणे, मुंबई बाजारातून तसेच अन्य ठिकाणाहून फुलांची आवक होत आहे. यंदा फुलांना जास्त मागणी असल्याचे एका फूल विक्रेत्याने सांगितले. मागील वर्षी हाराची किंमत ३० रुपये होती त्याची किंमत ७० रु . झाली आहे लहान हार गेल्यावर्षी १० रुपयाला होता तो २५ रुपयांपर्यंत गेला आहे. रायगड जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमधील फूल विक्रेत्यांकडे चर्चा केली असता अनेकांनी फुलांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगितले.
फुलांचे दर भिडले गगनाला
By admin | Updated: August 12, 2016 02:27 IST