नवी मुंबई : पामबीच रोडवरील एनआयआर कॉम्प्लेक्समधील ५२ क्रमांकाच्या इमारतीतील १५ व्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी मुंबई, वाशी, नेरूळ, सीबीडी, खारघर अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. आग पंधराव्या मजल्यावर असल्याने पाणी फवारणी करण्यासाठी ब्रॅन्टो स्काय लीफ्टचा वापर करण्यात आला. या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. चार जणांना वाचविण्यात यश आले आहे. पंधराव्या मजल्यावरील आग विझविण्यासाठी अग्निशमनदलाकडे योग्य यंत्रणा नसल्याने येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमनदलाला ही पाचारण करावे लागले. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आग पसरण्याच्या भीतीमुळे इमारतीतील सर्व रहिवाशी खाली आले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून निश्चित कारण समजले नाही. (प्रतिनिधी)
एनआरआयमध्ये आग
By admin | Updated: October 22, 2015 00:31 IST