- प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याचबरोबर वाहनांची सुध्दा वानवा आहे. या दोनही गोष्टीवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. प्रशिक्षित फायरमनची भरती करण्याबरोबरच दलात आणखी तीन नव्याने वाहने दाखल करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य अग्निशमन अभियानांतर्गत निधी मिळावा याकरिता प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे.पनवेल शहराचे क्षेत्रफळ वाढले नसले तरी या ठिकाणी लोकवस्ती आणि नागरीकरण वाढत आहे. वाड्यांची जागा आता टोलेजंग इमारतींनी घेतली असून व्यापारी पेठांचाही लूक बदलत चालला आहे. रुग्णालये, शोरूम, दुकाने, मॉलच्या संख्येत भर पडत आहे. त्याचबरोबर पनवेल शहरातून मुंबई-पुणे आणि बाजूने मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग जातात. या व्यतिरिक्त आजूबाजूला कारखाने असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होतात. त्याचबरोबर शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलावले जाते. कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी पोहचतात मात्र अनेकदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावून त्यांना काम करावे लागते.पनवेल नगरपालिकेकडे दोन वाहने आहेत. त्यापैकी एक १५ वर्षांपूर्वीचे असून ते नादुरुस्त आहे. त्या वाहनाच्या दुरु स्तीसाठी सातत्याने खर्च करून काम चालवावे लागते. एकच मिनी फायर टेंडर असल्याने अग्मिशमन दलाला मर्यादा येतात. शहराची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर इमारतींची संख्या विचार घेवून आजच्या घडीला अग्निशमन दलाकडे किमान चार वाहनांची आवश्यकता आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव अग्निशमन दल व या विभागाच्या अभियंत्याने प्रशासनाला सादर केला. नवीन तीन वाहने खरेदी करण्याकरिता सभागृहासमोर विषय सुध्दा घेण्यात आला. २६ जून २०१५ ला याबाबत ५६५ क्र मांकाचा ठराव संमत करण्यात आला. प्रशासकीय व आर्थिक मंजुरीकरिता हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाला सादर करण्यात आला आहे. राज्य अग्निशमन अभियानातून याकरिता एक कोटी अनुदान प्राप्त व्हावे यासाठी शासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे.मनुष्यबळही वाढवणारपनवेल नगरपालिकेच्या अग्निशमन दलात एकूण १५ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ फायर फायटर आणि तीन चालक असणार आहेत. कायमस्वरूपी भरतीला मंजुरी मिळाली नसल्याने सिडकोच्या धर्तीवर कंत्राटीपध्दतीने भरती करण्यात येणार आहे. फायरफायटरला १३ हजार आणि वाहनचालकाला १५ हजार वेतन देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे अग्निशमनदलाची ताकद वाढणार असल्याचा दावा सुध्दा प्रशासनाने केला आहे. अत्याधुनिक वाहने खरेदी करणारदोन वॉटर टेंडर व एक मिनी वॉटर टेंडर खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. जुनी झालेली गाडी बंद करण्यात येणार आहे. या तीनही फायर टेंडर वॉटर मिस्ट तंत्रज्ञानाच्या असणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली. उसनवारी कर्मचारी परतणारअग्निशमन दलात आरोग्य विभागातील कर्मचारी घेण्यात आले होते. ते काही वर्षांपासून या ठिकाणी काम करतात. मात्र नवीन कंत्राटी पध्दतीने भरती झाल्यानंतर हे कर्मचारी पुन्हा आरोग्य विभागात पाठविण्याचा प्रस्ताव आहे.
अग्निशमन दल सक्षम होणार !
By admin | Updated: December 17, 2015 01:57 IST