नवी मुुंबई : शहरामधील डेंग्यू व मलेरियाची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. करावे गावातील शर्मिला जयप्रकाश तांडेल या महिलेचा शनिवारी डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या परिसरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबईमध्ये यावर्षी डेंग्यू व मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषामुळे महापालिकेला विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागले होते. यानंतर प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरुवात केली असली तरी अद्याप साथ आटोक्यात आली नाही. करावे गावामध्ये दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त आहेत. याविषयी महापालिकेकडे तक्रारी करूनही त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. येथील रहिवासी शर्मिला तांडेल यांना डेंग्यू झाल्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला आहे. जूनपासून डेंग्यू व इतर साथीमुळे आतापर्यंत जवळपास २३ जणांचा मृत्यू झाला असून, पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना उपविभागप्रमुख सुमित्र कडू यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यूमुळे महिलेचा मृत्यू
By admin | Updated: November 2, 2015 01:51 IST