पालघर, दि. २९ : नकली सोने तसेच हिरे देऊन लोकांची लाखो रू. ची फसवणूक करणाऱ्या टोळीवर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनी नालासोपारा एस.टी डेपोजवळ झडप घालून दोन आरोपींना अटक केली असून एका महिला आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.नालासोपारा एस.टी डेपोजवळ एका कपड्याच्या व्यापाऱ्यास असली हिरे विक्री करायचे आहे असे भासवून चलाखीने बनावट हिरे देऊन लाखोंची फसवणूक करणारी टोळी येणार असल्याची विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षिका राऊत यांनी पो. नि. अशोक होनमाने, वसई युनिटचे सहा. पो. नि. साखरकर, पाटील, हवालदार महादेव वदेपाठक, शिवानंद सुतनासे, मंगेश चव्हाण, संदिप मोकल, मनोज मोरे, सचीन दोरकर यांनी दोन वेगवेगळी पथके नेमून सापळा रचला. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा व्यवहार सुरू असतानाच पोलीसांनी झडप घालून बाबुराव उमाजी भाटी उर्फ वाघरी (४१) रा. गांधीनगर गुजरात व पकाराम उर्फ प्रकाश उर्फ गोपाळ (२४) रा. जालोर राजस्थान यांना अटक केली. यावेळी या प्रकरणातील फिर्यादीना ६५५ नग हिरे खरे असल्याचे सांगुन खोटे हिरे दाखवून सुमारे १५ लाखांची फसवणूक करीत असताना त्यांना रंगेहात पकडले. यावेळी आरोपीजवळ ३९ लाख ३६ हजाराचे खरे हिरे, रू. ६५५० रू. चे नकली हिरे असा ३० लाख ४२ हजार ५५० रू. किंमतीचे हिरे सापडले. याच आरोपींनी ८ सप्टेंबरला खऱ्या सोन्याऐवजी खोटे सोने देऊन ९ लाख २५ हजारांची फसवणूक केली होती. या फसवणुकीतील ४ लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याचेही राऊत यांनी सांगितले.
नकली हिरे, सोने देऊन फसवणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: September 29, 2015 23:49 IST