महाड : महाडमध्ये विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, महाड शहरात दीडशेहून अधिक आॅटोरिक्षा विनापरवाना पूर्णपणे हद्दपार कराव्या, अशी मागणीसाठी एकता रिक्षाचालक-मालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर जंगम यांनी पत्रकार परिषदेत केली. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस आणि आरटीओकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप जंगम यांनी यावेळी केला. यावर संबंधित विभागाकडून कठोर कारवाई न झाल्यास १५ मार्चपासून आंदोलन छेडण्याचा इशारा एकता रिक्षा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनावणे व प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना संघटनेतर्फे देण्यात आले असून, येत्या तीन चार दिवसांत बेकायदा विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपाधीक्षक सोनावणे यांनी दिले.मनोहर जंगम यांनी सांगितले की, शहरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नंबरसह यादी शहर पोलिसांना संघटनेतर्फे दिली होती. याबाबत आरटीओची देखील भेट घेऊन सर्व परवानाधारक, शासकीय कर व इन्शुरन्स रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर कसा अन्याय होतो, याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र आजतागायत त्यांच्यावर दोन्ही विभागांकडून कारवाई केली नसल्याचा आरोप जंगम व मामा पालकर यांनी यावेळी केला. यावेळी सचिन बामणे, गजानन तुपर आदी उपस्थित होते.
विनापरवाना आॅटोरिक्षा हद्दपार करा
By admin | Updated: March 3, 2016 02:40 IST