महाड : येथील औद्योगिक परिसरातील एम्बायो लि. या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे दूषित पाणी कारखान्याबाहेर राजरोसपणे सोडण्यात येत असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रदूषण करणाऱ्या एम्बायो कारखान्यावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी दिली.एम्बायो या कारखान्याकडून होणाऱ्या या प्रदूषणाबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. या कारखान्याच्या शेजारीच जीते आणि खैरे शैलटोली या गावच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर कारखान्यात प्रक्रिया न करताच दूषित सांडपाणी सर्रासपणे सोडले जाते. घातक रसायनमिश्रित पाणी या विस्तीर्ण भूखंडावर पसरून अनेक ठिकाणी साचले आहे, हे पाणी सावित्री नदीला मिळणाऱ्या नाल्यात वाहून जात आहे. यामुळे जीते गावचे कब्रस्थान व भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कारखान्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्र असले तरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी एम्बायो कारखान्याने प्रक्रिया न करताच दूषित पाणी बाहेर सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी तसेच ते पसरलेल्या टेमघर नाल्यापर्यंतच्या परिसराची पाहणी केली. त्यावेळी कारखान्यावर कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.गेल्या वर्षभरापासून महाड औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी केंद्राकडून प्रत्येक कारखान्यातील सांडपाण्याचे टप्प्याटप्प्याने नमुने घेतले जात आहेत. यामुळे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना लगाम बसला आहे. सामायिक सांडपाणी केंद्र तसेच प्रदूषण मंडळाच्या संयुक्तिक कार्यवाहीमुळे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण रोखण्यात यश आल्याचे पहायला मिळत आहे. मात्र एम्बायोसारखे कारखाने या यंत्रणांनाही चकवा देत प्रक्रिया न करताच सांडपाणी कारखान्याबाहेर सोडत आहेत. रसायनमिश्रित सांडपाणी भल्यामोठ्या साठवण टाकीत साठवून ते पाइपलाइनद्वारे शेजारील भूखंडावर सोडण्यात येत आहे. (वार्ताहर)
दूषित पाणी मोकळ्या भूखंडावर
By admin | Updated: November 2, 2015 02:13 IST