आविष्कार देसाई ल्ल अलिबागहेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन प्रणालीअंतर्गत ई-रुग्णालयासाठी रायगड जिल्ह्याच्या अलिबाग येथील सरकारी रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ई-रुग्णालयाची मुहूर्तमेढ अलिबाग येथे रोवली जाणार असल्याने जिल्ह्याची आरोग्य सेवा आणि सुविधा सुधारण्यास मदत होईल. आरोग्य व्यवस्थेमध्ये अधिक गुणवत्ता यावी आणि रुग्णांना त्वरित उपचार मिळावे, त्यासाठीची कामे वेगाने व्हावीत, त्याचप्रमाणे पेपर लेस पध्दतीने जास्तीत जास्त काम करणे हा त्यामागचा उद्देश आहे. राज्यातील सर्व जिल्हा सरकारी रुग्णालयातून अलिबागची निवड झाली असतानाच नाशिकच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचीही पायलट प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे.अलिबागच्या रुग्णालयाला या प्रोजेक्टसाठी ६० लाख ९४ हजार ३५३ रुपयांची सामग्री उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी दिली. ५८ संगणक, दोन प्रिंटर, १० टॅबलेट, दोन सर्व्हर यासह अन्य साहित्यांचा समावेश आहे. अलिबाग रुग्णालयातच सर्व्हर वर्कस्टेशन कार्यान्वित करण्यात येईल. जिल्ह्यात मुंबई-गोवा आणि मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होतात. वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या रुग्णालयामुळे रुग्णांना नक्कीच फायदा होईल. केस पेपरची गरज नाहीओपीडीत आल्यावर रुग्णाला केस पेपर काढायची गरज भासणार नाही. त्याची सर्वप्रथम संगणकावर नोंद केली जाणार आहे. त्यावेळी त्याला एक युनिक आयडी नंबर दिला जाणार आहे. डॉक्टरांनी संबंधित रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याला कोणती औषधे कोणत्या कारणासाठी दिली आहेत याची नोंद आपल्याकडील संगणकावर करणार आहेत. त्याच्यावर होणाऱ्या उपचाराचा सर्व लेखाजोखा संगणका बरोबरच सर्व्हरमध्ये फिड होणार आहे. डिस्चार्ज करताना संबंधित रुग्णाला ती फाईल दिली जाणार आहे. माहिती राहणार अपडेटरोज किती रुग्ण दाखल झाले, किती डिस्चार्ज केले, तसेच किती रेफर केले याची माहिती दररोज अपडेट होणार आहे. कोणता रुग्ण कोणत्या वॉर्डमध्ये अॅडमीट आहे याची माहितीही संगणकाच्या एका क्लिकवर प्राप्त होणार आहे. यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटला एक पासवर्ड देण्यात येईल. सीडॅक देतेय ट्रेनिंगसंगणक क्षेत्रातील सीडॅक कंपनीचे नितीश शर्मा आणि त्यांचे सहकारी सध्या रुग्णालयातील प्रत्येक डिपार्टमेंटमधील डॉक्टर, कर्मचारी यांना ट्रेनिंग देत आहेत. दोन महिने हे ट्रेनिंग सेशन सुरु राहणार आहे.रुग्णांची केस हिस्ट्री मिळणारभविष्यात सर्व रुग्णालये ई - रुग्णालये होतील. रुग्ण पुण्या - मुंबईत उपचारासाठी गेल्यास तेथे त्याने त्याचा युनिक आयडी नंबर अथवा नाव सांगितल्यावर केस हिस्ट्री उपलब्ध होईल.
अलिबागमध्ये ई-रुग्णालय
By admin | Updated: February 3, 2015 23:00 IST