प्राची सोनावणे, नवी मुंबईराज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची भयाण स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरणीही झालेली नाही. ना प्यायला पाणी, ना हाताला काम, त्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त मुंबई, नवी मुंबईत येऊ लागले आहेत. मिळेल ते काम करून उड्डाणपुलाखाली व जागा मिळेल तिथे मुक्काम आपला उदरनिर्वाह करत आहेत. येथेही त्यांची उपासमार मात्र टळलेली नाही. राज्यात २०१२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळापेक्षा गंभीर स्थिती या वर्षी निर्माण झाली आहे. जगायचे कसे असा प्रश्न पडलेली शकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात मुंबई, नवी मुंबईमध्ये येऊ लागली आहेत. जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील जवळपास ४०० कुटुंबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेक जण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करीत आहेत. दिवसभर मिळालेल्या पैशावर धान्य विकत घेऊन पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे. काम करण्याची क्षमता नसलेली कुटुंबातील वयस्कर माणसे रेल्वे स्टेशन व इतर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. कर्जबाजारी शेतकरी पिकाअभावी त्रस्त झाले असून कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 400 संसार रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी वृद्ध आई-वडील, लहान मुलांना गावी ठेवले असून, काम मिळविण्यासाठी येथे आले आहेत. गावाकडील माणसांसाठी जीव तुटत असल्याचे सांगताना त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी झाली...गावाकडे रोजगाराचे साधन नसल्यामुळे मुंबईत आलो आहे. कामासाठी नाक्यावर उभे राहावे लागते. कधी काम मिळते तर कधी मिळत नाही. कित्येक वेळा काम न मिळाल्यामुळे उपाशीच झोपावे लागते. - किसन माळी, शेतकरी जालना
दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत
By admin | Updated: September 5, 2015 02:02 IST