नामदेव मोरे ।नवी मुंबई : प्राथमिक सुविधांसाठी झगडणाºया रानसई आदिवासी पाड्यांवरील नागरिकांसमोर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे नवीन संकट ओढवले आहे. अनकेत रवींद्र शिंगवा (१५) व धर्मी आयत्या दोरे (५२) या दोघांचा श्वानदंशामुळे मृत्यू झाला असून, सहा जण श्वानदंशामुळे जखमी झाले आहेत. जखमीने त्याच्या आजोबांचा चावा घेतला असून या घटनेमुळे पूर्ण आदिवासी पाड्यांवर खळबळ उडाली आहे. आदिवासींवर उपचार करण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने जखमींपैकी अजून काहींचा मृत्यू होण्याची भीती रहिवाशांना वाटू लागली आहे.रानसई धरणामुळे जगाशी संपर्क तुटलेल्या आदिवासींच्या जीवनातील समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. उरण व पनवेलच्या मध्यभागी डोंगरावर असलेल्या रानसईच्या सहा आदिवासी पाड्यांवर अद्याप आरोग्य सुविधाच पोहचली नाही. यामुळे उपचाराअभावी गरीब आदिवासींना जीवास मुकावे लागत आहे. सर्पदंश झाल्यामुळे व इतर आजारांनी रुग्णालयापर्यंत पोहचण्यापूर्वीच अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गत आठ दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्याने या परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. खैरकाठी येथी अनकेत रवींद्र शिंगवा हा चिपळेमधील आदिवासी आश्रमशाळेमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत होता. दीप अमावस्येला तो सुटीनिमित्त घरी आला असताना त्याला कुत्रा चावला. उपचारासाठी काहीही सोय नसल्याने तो सुटी संपल्यानंतर पुन्हा शाळेमध्ये गेला, परंतु तेथे त्याचा पाय दुखू लागला. शरीराला खाज सुटू लागली. प्रकृती बिघडू लागल्याने त्याला पालकांनी शाळेत येऊन घरी नेले होते. घरी असतानाच अनकेतने त्याचे आजोबा धावू राया शिंगवा यालाही चावा घेतला. यामुळे अखेर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले व तेथून मुुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने ३० जुलैला त्याला घरी आणले व येथेच त्याचा मृत्यू झाला. या परिसरातील धर्मी आयत्या दोरे या महिलेलाही कुत्रा चावला. तिलाही वेळेत औषधोपचार मिळू शकले नसल्याने तिचा मृत्यू झाला आहे.या परिसरातील कमळी नामदेव शिंगवा, आयत्या राघो दोरे (मयत धर्मीचा पती), महेश भास्कर दोरे, सुजल रमेश दोरे, बबलू सोमा लेंडे यांना कुत्रा चावला आहे. या जखमींवर अद्याप योग्य उपचार करण्यात आलेले नाहीत. त्या सर्वांच्या अंगाला खाज येऊ लागली आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या जागेवर तीव्र वेदना होऊ लागल्या आहेत. याशिवाय किरण वामन दोरे हा जखमीच्या सान्निध्यात राहात असल्याने त्यालाही बाधा झाली असून कुत्रा चावलेल्यांप्रमाणे लक्षणे त्याच्यातही दिसू लागली आहेत. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण आदिवासी पाड्यामध्ये खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत. जखमींना तत्काळ योग्य उपचार मिळाले नाहीत तर अजून काही जणांना जीव गमवावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.रानसई आदिवासी पाड्यावरकु ठल्या ही सुविधा नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कुत्रा चावल्याने उपचाराअभावी दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:58 IST