पनवेल : सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाºयासह दुर्गंधीचे खापर सिडकोवर फोडण्यास सुरुवात केली असल्याने सिडको खडबडून जागी झाली. पनवेलकरांच्या असंतोषामुळे सिडको प्रशासनाने कचराकोंडीची मनमानी भूमिका बदलून शुक्रवारी मध्यरात्रीपासून कचरा उचलण्यास सुरुवात केली.तीन दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या नोडमधील कचरा उचलण्यास सिडकोने अचानकपणे बंद केले. विशेष म्हणजे, तीन दिवस रस्त्यावर कचरा कुजत असताना सिडको प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत होते. नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाºया सिडको प्रशासनाविरोधात तिसºया दिवशी उद्रेक पाहावयास मिळाला. यासंदर्भात मार्ग न काढल्यास आंदोलनाचा इशारा शहरातील संघटना व राजकीय पदाधिकाºयांनी दिल्यानंतर सिडकोने कचरा उचलण्यास सुरु वात केली आहे. विशेष म्हणजे, पायाभूत सुविधेची जबाबदारी सिडकोकडे असतानाही हस्तांतरणाची कारण पुढे करीत सिडकोने लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला. सध्याच्या घडीला पारा ४० सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. प्रचंड उकाड्याचा त्रास त्यातच रस्त्यावर कचºयाचा खच, असेच चित्र सध्या पनवेलमधील विविध ठिकाणी पाहावयास मिळत होते. रस्त्यावर कुजत असलेला कचºयापासून रोगराई पसरू नये, म्हणून हा कचरा नागरिकांनी पेटविल्याच्या घटनाही खारघर, कळंबोली परिसरात पाहावयास मिळाल्या आहेत. शासनाच्या नगरविकास खात्याने सिडको नोडमधील पायाभूत सुविधा पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेचे दोन्ही आयुक्त आणि सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे. येत्या तीन महिन्यांत हस्तांतरणासंदर्भात रोडमॅप ही समिती शासनाला सादर करणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपाने कचरा उचलण्यासाठी सिडकोला पालिका खर्च देण्यास तयार असल्याचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, पनवेलमधील उद्भवलेली परिस्थिती नागरिकांचा आक्रोश पाहता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सिडकोला कचरा उचलण्याचे आदेश दिल्याचे समजते.खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, तळोजा आदी ठिकाणी शनिवारी सकाळपासूनच कचरा उचलायला सुरुवात केली असली, तरी जवळ जवळ २००० टन कचरा उचलणे बाकी असल्याने दुपारपर्यंत अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग कायम होते. सिडकोमार्फत कचरा उचणार असल्याचे सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी सांगितले.सिडको वसाहतीत शहर साफसफाई करण्यासाठी ७४० सफाई कामगार, २२ घंटागाड्या, ८५ घंटागाडी कामगार, दररोज जमा होणारा ३५० टन कचरा उचलत असतात. मात्र, सध्याच्या घडीला २००० टनपेक्षा जास्त कचरा विविध सिडको वसाहतीत पडलेला असल्याने सिडकोच्या मार्फत जादा कुवक मागवत जेसीबी व डंपरच्या साहाय्याने कचरा उचलायला सुरु वात केली आहे. प्रत्येक नोडमध्ये दोन ते तीन जेसीबी कचरा उचलण्यासाठी विभागनिहाय सुरू करण्यात आलेल्या आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी डंपरही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
पनवेलकरांच्या असंतोषामुळे सिडकोची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 2:08 AM