वैभव गायकर, पनवेलमोबाइल कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेमुळे ठिकठिकाणी मोबाइल टॉवर्सची संख्या वाढत चालली आहे. सोसायट्यांना पैशाचे आमिष दाखवून मोबाइल कंपन्या शहरात टॉवर्सचे जाळे पसरवत आहेत. अशा अनधिकृत मोबाइल टॉवर्सना नोटिसा पाठवून लवकरच पालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे. शहरात अनधिकृत मोबाइल टॉवर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नगर परिषदेचा यामधून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर बुडत आहे. शहरात एकूण अधिकृत मोबाइल टॉवर्सची संख्या २१ आहे, तर अनधिकृत मोबाइल टॉवर्सची संख्या २३ आहे. या मोबाइल टॉवर्समधून बाहेर पडणाऱ्या घातक लहरी मानवी शरीराला हानिकारक आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या लहरींमुळे हृदयविकार, रक्तदाब आदीसारखे विविध आजार जडत असतात. व्होडाफोन, टाटा, रिलायन्स, एअरटेल यासारख्या मोठ्या कंपन्यांची यामध्ये स्पर्धा सुरू असल्याने दिवसेंदिवस हे मोबाइल टॉवर्स वाढत चालले आहेत. अनेक सोसायट्या मोबाइल कंपन्यांच्या आमिषाला भुलत आहेत. सोसायट्या टेरेसवर हे टॉवर्स बसवून घेत आहेत. ठरावीक रकमेमुळे सोसायट्यांच्या सदस्यांचा मेंटनन्स यामुळे वाचतो. त्यामुळे दिवसेंदिवस अनेक इमारतींवर अशाप्रकारचे वाढते मोबाइल टॉवर्स दिसत आहेत. हे टॉवर्स उभारताना स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी बंधनकारक असतानादेखील मोबाईल टॉवर्स कंपन्या सर्रास अनधिकृत टॉवर्स उभारत आहेत. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारे शहरांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विनापरवाना या टॉवर्समुळे पालिकांचे लाखो रु पयांचा महसूलदेखील बुडत आहे. पनवेल नगर परिषदेच्या वतीने अशा अनधिकृत टॉवर्सना वारंवार नोटिसा पाठवूनही काहीच फरक पडला नसल्याचे चित्र आजवर पाहावयास मिळाले आहे. यामुळे पनवेलकरांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत मोबाइल टॉवर्सचा सुळसुळाट
By admin | Updated: November 2, 2015 02:15 IST