लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: ट्रान्स हार्बर मार्गावर तुर्भे नाक्याजवळ रेल्वे रूळ ओलांडताना चंदाबाई धांजे या महिलेचा मृत्यू झाला. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पादचारी पुलाचे काम मार्गी लागले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंदिरानगर चुनाभट्टी येथे राहणाऱ्या चंदाबाई शिवाजी धांजे या सकाळी कामानिमित्त रेल्वे रूळ ओलांडून तुर्भे जनता मार्केटकडे जात होत्या. एक रेल्वे रूळ ओलांडल्यानंतर त्यांना ट्रेन आल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दोन्ही रुळांच्या मध्येच थांबणे पसंत गेले. त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या रेल्वेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमध्ये सर्वाधिक रेल्वे अपघात याच परिसरामध्ये होत आहेत. यापूर्वी एकाच वेळी तीन व्यक्तींचाही येथे मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अपघातानंतर रेल्वे व महापालिका प्रशासनाने येथे पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे पुन्हा पुन्हा अपघात होवू लागले आहेत. तुर्भे नाका, इंदिरानगर ते बोनसरी मधील नागरिकांना किराणा मालापासून सर्व खरेदी करण्यासाठी तुर्भे जनता मार्केटमध्ये जावे लागत आहे. या परिसरातील विद्यार्थीही शिक्षणासाठी तुर्भे गावातच जात असतात. रोज ८ ते १० हजार नागरिक रेल्वे रूळ ओलांडत असून अपघात होत आहेत. अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले यांच्यासह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही केली आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना तुर्भेत महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 31, 2017 06:34 IST