अलिबाग : जागतिक महिला दिनी रायगड जिल्ह्यात महिला सहाय्य व संरक्षणाकरिता कार्यान्वित झालेल्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकातील अलिबाग पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत महिला पोलीस प्रियंका घरत आणि सोनम कांबळे अलिबाग शहर परिसरात मोटारसायकल गस्त घालत होत्या. यावेळी त्यांना हरवलेली मनोरु ग्ण महिला आढळली. तिला पोलीस ठाण्यात आणल्यावर तेथे तक्रार करण्यासाठी आलेल्या पुतण्याने तिला ओळखले आणि या दामिनी पथकामुळे काक ी-पुतण्याची भेट झाली.प्रियंका घरत आणि सोनम कांबळे या गस्त घालत असताना एक मनोरुग्ण महिला त्यांना घाबरलेल्या अवस्थेत पिंपळभाट येथे दिसली. तिची त्यांनी विचारपूस केली असता ती नीट काही सांगू शकत नव्हती. बहुदा ती हरवलेली असावी असा अंदाज बांधून प्रियंका घरत आणि सोनम कांबळे या दोघींनी त्यांना गुरुवारी दुपारी ४.३० वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात आणले. त्याच वेळी आपल्या हरवलेल्या काकीच्या शोधासाठी तक्रार दाखल करण्याकरिता अलिबाग पोलीस ठाण्यात आलेल्या तिच्या पुतण्या व पुतणीची भेट झाली. काकी-पुतण्यांच्या भेटीने उभयतांच्या डोळ््यात आनंदाश्रू तरळले. बुधवारी आपल्या काकीला घेवून तिचे पुतण्या-पुतणी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या जवळूनच काकी हरवलेल्या. त्यांनी अलिबाग परिसरात शोध घेतला मात्र यश आले नाही. काकी-पुतण्या हे रोहा तालुक्यातील फणसडोंगरी गावातील रहिवासी आहेत. काकी गावी फणसडोंगरीलाच गेली असावी असा विचार करुन पुतण्या-पुतणी फणसडोंगरीला पोहोचले, मात्र तेथे नसल्याचे समजले. अखेर त्यांनी रोहा पोलीस ठाणे गाठले. काकी अलिबागला हरवली असल्याने हरवल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केल्यास लवकर शोध लागेल असे रोहा पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यामुळे ते गुरुवारी अलिबाग पोलीस ठाण्यात आले होते.
दामिनी पथकाची अलिबागमध्ये पहिली यशस्वीता
By admin | Updated: March 11, 2016 02:40 IST