अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नऊ पोलीस स्थानकांच्या क्षेत्रात महिलांच्या संरक्षणासाठी महिला पोलिसांचे दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी जागतिक महिला दिनाच्या संध्याकाळी हिरवा झेंडा दाखवून पथकाचा सेवा शुभारंभ केला. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले म्हणाल्या, दामिनी पथकामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. कुठल्याही प्रकारची आडकाठी न ठेवता महिला या पथकाला आपल्या तक्रारी सांगू शकतील. महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी करण्यासाठी महिलांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता समानतेची वागणूक दिली पाहिजे. त्यातूनच त्यांची मानसिकता घडत असते. प्रत्येक नागरिकाने पोलिसांचे मित्र म्हणून वागले किंवा काम केले तर गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होऊ शकेल असे सांगून त्यांनी दामिनी पथकाला शुभेच्छा दिल्या. दामिनी पथक हे महिलांचे महिलांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेले पथक आहे. हे पथक गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गस्त घालून महिलांची छेडछाड तसेच महिलांसंदर्भातील इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक एक टाकलेले पहिले पाऊल असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी यावेळी बोलताना सांगितले. नि:शब्द फाऊंडेशन, समय क्रिएशन पेण या संस्थेच्या वतीने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्र मास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक राजा पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
महिलांसाठी दामिनी पथक कार्यान्वित
By admin | Updated: March 9, 2016 03:39 IST