- मयूर तांबडे, पनवेल
कळंबोली वाहतूक शाखेने बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोर्इंग चालू केले आहे. दररोज जवळपास ५० ते ६० हून अधिक वाहने टोचन करून नेली जातात मात्र शासकीय दरबारी केवळ १० ते १५ वाहनांचाच महसूल जमा होत असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. त्यामुळे कळंबोली वाहतूक शाखेच्या टोर्इंग व्हॅनमध्ये महिन्याला लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे. कळंबोली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, कोंडी दूर व्हावी यासाठी टोर्इंग व्हॅन सुरु करण्यात आली. मात्र त्यामुळे टोर्इंगवरील वाहतूक पोलीसच मालामाल होताना दिसत आहेत. नो पार्किंग क्षेत्रात गाडी लावणाऱ्या दररोज पन्नासहून अधिक दुचाकी तसेच जवळपास १० ते १५ चारचाकी वाहनांना टोचन करून नेले जाते. दुचाकीचे २०० रु पये तर चारचाकी वाहनाचे ३०० रु पये घेऊन गाडी सोडली जाते. मात्र यातील केवळ १० ते १५ दुचाकीस्वारांना दंड भरल्याच्या पावत्या दिल्या जात आहेत. एका दिवसाला जवळपास ५० दुचाकी गाड्यांना टोचन लावण्यात येत असेल तर दिवसाचे १० हजार रु पये दंड शासन दरबारी जमा व्हायला हवेत मात्र तसे न होता टोचनवरील वाहतूक पोलीस विनापावती पैसे घेतल्याचे चित्र कळंबोली वाहतूक शाखेत दिसत आहे. दररोज हजारो रु पये विनापावत्या जमा केले आहेत. कळंबोली वाहतूक शाखेकडील टोर्इंग व्हॅनद्वारे वाहनांवर २०१४ ते ५ जून २०१५ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध नाही. तर जून १५ ते डिसेंबर २०१५ या वर्षामध्ये कळंबोली वाहतूक शाखेची टोर्इंग व्हॅन प्रत्येकी ४२ दिवस तर जानेवारी १६ ते जून १६ पर्यंत ३७ दिवस टोर्इंग व्हॅन बंद होती. उरलेल्या दिवसात केवळ २०४७ दुचाकी वाहनांकडून प्रत्येकी शंभर रु पयाप्रमाणे ३,४७,००० रु पयांचा दंड जमा करण्यात आला. तर १४३ चारचाकी वाहनांकडून प्रत्येकी १०० रु पयाप्रमाणे १४,३०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र दुचाकीचे २०० रु पये घेतले जातात तर चारचाकी वाहनाचे ३०० रु पये घेऊन गाडी सोडली जाते. प्रत्यक्षात दोनशे रुपये घ्यायचे व पावती शंभर रु पयांची द्यायची असा प्रकार राजरोसपणे सुरूच आहे. या टोचनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे ती बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे.याबाबत कळंबोली वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांना विचारले असता जेवढ्या गाड्यांवर कारवाई होते तेवढ्या गाड्यांची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीनिवास मुंडे यांच्याकडे टोचनमधील भ्रष्टाचाराबाबत विचारणा केली असता, टोचनवरील कर्मचाऱ्याला त्यांनी रजिस्टर आणायला सांगितले व चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.