- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या महामारीमधून नवी मुंबईकरांना वाचविण्यासाठी महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली आहे. वाशीमधील मनपाचे सर्वसाधारण रुग्णालय नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केले आहे. तेथे कोरोनासाठी ४०० बेडची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय मनपासोबत शहरात मास स्क्रीनिंग मोहीमही राबविली जात आहे.नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. सद्य:स्थितीमध्ये शहरातील रुग्णांची संख्या ३९९८ झाली असून मृतांची संख्या १२१ झाली आहे. रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील, तेरणा, अपोलो, एमजीएम व रिलायन्स रुग्णालयाचाही समावेश आहे. मनपाचे वाशीमधील सर्वसाधारण रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील रुग्णांना कुठे पाठवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. या वेळी डी.वाय. पाटील व्यवस्थापनाने मनपाच्या रुग्णांना मनपाच्याच सवलतीमध्ये उपचार देण्याची तयारी दर्शविली व ६ एप्रिलपासून तेथे रुग्ण संदर्भित करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ओपीडीमध्ये १५७० रुग्ण व आयपीडीमध्ये ७७५ रुग्ण संदर्भित केले आहेत. तेथे निरीक्षणासाठी मनपाचे पथक तैनात आहे. यामुळे शहरातील कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी उपचाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे.कोरोना रुग्णांसाठीही डी.वाय. पाटील हॉस्पिटलने पूर्ण एक विंग उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत तेथे ३०० बेड उपलब्ध करून देण्यात येत होते. नुकतीच महानगरपालिका आयुक्तांनी तेथील व्यवस्थापनाशी चर्चा करून १०० बेड वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे यापुढे तेथे ४०० बेड उपलब्ध केले जाणार आहेत. वाढीव बेडसाठी व्हेंटिलेटरची सुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. लवकरच वाढीव बेड कार्यान्वित केले जाणार आहेत. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून काही रुग्णालयांनी त्यांचे दवाखाने बंद केले. खासगी डॉक्टरांची क्लिनिकही बंद झाली आहेत. मनपाने काही रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या स्थितीमध्ये काही खासगी रुग्णालयांनी मात्र चांगले सहकार्य करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे कोरोनाशी लढा देण्यास मनपाच्या यंत्रणेला यश येऊ लागले आहे. डी.वाय. पाटील व इतर रुग्णालयांप्रमाणे सर्वच खासगी रुग्णालयांनी सहकार्य केले तर नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे शक्य होणार आहे.डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयातील रुग्णांचा तपशीलनॉन कोविड ओपीडी ६ एप्रिलपासून १५७०नॉन कोविड आयपीडी ७७५कोविड ओपीडी २० एप्रिलपासून २२५८कोविड आयपीडी ७८८कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांचेही सहकार्य घेतले जात आहे. नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्ण पाठविण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांसाठी यापूर्वी तेथे ३०० बेड उपलब्ध केले असून लवकरच १०० बेड वाढविण्यात येणार आहेत.- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त महानगरपालिकाकोरोनाच्या जागतिक महामारीविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी योगदान देणे महत्त्वाचे आहे. आम्ही महानगरपालिकेशी योग्य संवाद ठेवून जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. मनपाचे जनरल हॉस्पिटलचे रुग्ण व कोविड रुग्णांवरही उपचार करत असून यासाठी रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी योग्य सहकार्य करत आहेत.- विजय पाटील, अध्यक्ष,डॉ. डी.वाय. पाटील समूहमहानगरपालिकेशी समन्वय साधून नवी मुंबईकरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कोविड व नॉन कोविड रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. कोरोनासाठी बेडची संख्या वाढविण्यात येणार असून त्यासाठी महानगरपालिका व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणार आहे.- डॉ. राहुल पेद्दावाड, सीईओ, डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय
CoronaVirus News: महामारीमध्ये मनपास खासगी रुग्णालयांचाही मोठा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:46 IST