पनवेल : अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून ही सेवा सुरू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रथमच रेल्वे प्रवास केलेल्या प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे प्रथमच अतिशय शिस्तबद्धरीत्या रेल्वे स्थानकावरील कामकाज चालत असल्याचे पाहावयास मिळाले.या अत्यावश्यक सेवेतील घटकांमध्ये पोलीस, बँक कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पालिका कर्मचारी, माध्यम क्षेत्रातील तसेच अत्यावश्यक सेवेत मोडणाºया नागरिकांना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जात होता. याकरिता रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यापूर्वी सोबत ओळखपत्र बाळगणे अनिवार्य करण्यात आले होते. रेल्वे पोलीस तसेच रेल्वेचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाची चौकशी करत होते. तिकीट काढण्यापूर्वीदेखील आपले ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले होते. पनवेल ते बेलापूर दरम्यान सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी सुटलेल्या लोकलने प्रवास केलेले प्रवासी हर्षल पांडव यांनी या निर्णयाचे स्वागत केले. बँक कर्मचारी असल्याने लॉकडाऊनच्या काळात मला रोज प्रवास करावा लागत असे, मात्र आज सुरू झालेल्या रेल्वे सेवेने माझा प्रवास सुखकर झाला. मी बसलेल्या डब्यात अवघे दहा प्रवासी होते. सर्व शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करीत होते. रेल्वे स्थानकावर चोख बंदोबस्त होता. केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांना स्थानकावर प्रवेश दिला जात होता. हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह असल्याचे हर्षलने सांगितले.लॉकडाऊनमध्ये प्रथमच धावली लोकल शिस्तबद्धरीत्या रेल्वे स्थानकावरील कामकाजअनेकांना रेल्वेबाबत कल्पना नसल्याने अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले. मंगळवारी ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. पनवेलवरून सकाळी ४ वाजून ३ मिनिटांनी पहिली लोकल सुटली. शेवटची लोकल रात्री ११ ची होती.अत्यावश्यक सेवेतील घटकांना त्यांचे ओळखपत्र बघून प्रवेश दिला जात होता. या वेळी संबंधित प्रवाशांची थर्मल टेस्टदेखील करण्यात आली. पहिला दिवस असल्याने प्रवाशांची कमी गर्दी आज पाहावयास मिळाली.- एस.एम. नायर, स्टेशन मास्तर, पनवेलट्रान्स हार्बरवर शुकशुकाटचसोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी रेल्वे सुरू करण्यात आल्या. परंतु ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेचा त्यात समावेश नव्हता. यामुळे ठाणे ते वाशी मार्गावरी ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे ही रेल्वे स्थानके ओस पडली होती.नवी मुंबईत जाण्यासाठी पर्यायी वाशी रेल्वे स्थानकातून अनेकांना निश्चित ठिकाणी जावे लागले. तर हार्बर मार्गावर तीन महिन्यांनी पुन्हा एकदा रेल्वे धावल्याने सीबीडी बेलापूर, नेरूळ, सानपाडा तसेच वाशी स्थानकात काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती.
CoronaVirus News: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी केले रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:49 IST