नवी मुंबई : महानगरपालिकेने सुरू केलेल्या मास स्क्रीनिंग (सामूहिक तपासणी) मोहिमेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी नगरसेवकांकडून केला जात आहे. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही दबाव टाकला जात असून, त्यांचे मनोबल खच्ची केले जात आहे. अशा प्रकारे अडथळे आणले जाऊ नयेत, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष मास स्क्रीनिंग मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ३0,२७६ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. प्रतिदिन दोन ते तीन ठिकाणी ही मोहीम राबविली जात आहे. या उपक्रमाचे काही माजी नगरसेवकांकडून श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मनपा आयुक्तांना प्रभागात मास स्क्रीनिंग मोहीम राबविण्याची मागणी केली जात आहे. जिथे शिबिर आयोजित केले जाते, तेथे जाऊन फोटोसेशन करून त्याचा सामाजिक माध्यमांवरून प्रसार केला जात आहे. काही ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली जात आहे. यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य शिबिर घेणाºया कर्मचाºयांचे मनोबल खचत आहे. याविषयी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडेही कर्मचाºयांनी तक्रारी केल्या आहेत.पालिकेच्या उपक्रमाचे राजकीय श्रेय घेणाºयांविषयी नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, मास स्क्रीनिंग मोहिमेचे माजी नगरसेवकांकडून श्रेय घेण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आरोग्य कर्मचाºयांचे मनोबल खच्ची होईल, असेही वर्तन काही ठिकाणी होत आहे. सर्व राजकीय पक्षांनी मनपास सहकार्य करावे, अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
CoronaVirus News: पालिकेच्या मोहिमेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न; आरोग्य विभागावरही दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:19 IST