दीपक मोहिते ल्ल वसईप्रभाग क्र. १९ मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात स्थानिक नगरसेवक सुदेश चौधरी यशस्वी ठरले. गेल्या साडेचार वर्षात ३० कोटी रू. ची विकासकामे त्यांनी केली. प्रभाग समितीचे सभापती असून अन्य प्रभागालाही त्यांनी विकासकामासाठी चांगला निधी उपलब्ध केला. पाण्याची समस्या जाणवत असली तरी येत्या ३ ते ४ महिन्यात सुर्या पाणीपुरवठा योजनेचा टप्पा २ पुर्ण होईल व या भागातील करदात्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळू शकेल असा विश्वास त्यांना वाटतो.स्थानिक रहिवाशांची निवासस्थाने तसेच गेल्या काही वर्षात उभारण्यात आलेली नागरी संकुले यांचा समावेश असलेला हा प्रभाग मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या १० वर्षात या परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व नागरीसुविधांचे अनेक प्रश्न उभे ठाकले. तत्कालीन नगरपरिषदेच्या माध्यमातुन विकासकामे करणे काही अंशी शक्य झाले परंतु वाढते नागरीकरण लक्षात घेता येथील विकासकामांना सध्या जी गती आली आहे ती महानगरपालिकेच्या माध्यमातुन मिळणाऱ्या आर्थिक निधीतुनच. पुर्वी विकासकामे करताना आर्थिक निधीची चणचण भासत असे परंतु महानगरपालिका आल्यानंतर भरीव आर्थिक निधी उपलब्ध झाला. अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागली. यामध्ये रस्ता रूंदीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, हायमास्ट लावणे इ. कामे पार पडली. सध्या प्रभागाला पाणी कमी मिळत असले तरी येत्या ३ ते ४ महिन्यात पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी निकाली निघेल असे प्रभाग समिती सभापती सुदेश चौधरी यांचे म्हणणे आहे. त्यांच्या प्रभागामध्ये ३० मीटरचा डेव्हलपमेंट रोड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.महानगरपालिकेमुळे विकासकामांना चांगला निधी उपलब्ध झाला. सभापती पद मिळाल्यानंतर प्रभागातील विकासकामे मार्गी लागली परंतु प्रभाग समितीमधील अन्य प्रभागांनाही मी आर्थिक निधी मिळवून देवू शकलो. रस्ता रूंदीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे व नवा डीपी रोड बांधणे इ. महत्वाची कामे मी करू शकलो. पाण्याच्या प्रश्नी लवकरच प्रभागातील करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ महिन्यात सुर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुर्ण होईल व परिसराला अधिक पाणी मिळु शकेल.- सुदेश चौधरी, नगरसेवक
३० कोटींची विकासकामे पुर्ण
By admin | Updated: January 24, 2015 22:54 IST