नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आणि पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे सिडकोच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी ५६९ अनधिकृत बांधकामांचा सहभाग असलेली दुसरी यादी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व बांधकामे जून २0१५ नंतर पूर्ण झालेली आहेत. या बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याची योजना सिडकोने तयार केली आहे. दरम्यान, जून २0१५ अगोदर अर्धवट अवस्थेत असलेल्या परंतु त्यानंतरच्या काळात बांधकाम पूर्ण करून त्याचा वापर सुरू असलेल्या इमारतींवरसुद्धा कारवाई करण्याचे सूतोवाच सिडकोकडून करण्यात आले होते. त्यानुसार उरण व पनवेल तालुक्यातील काही बांधकामांवर कारवाई करून सिडकोने दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभसुध्दा केला. परंतु मागील आठ-दहा दिवसांपासून ही मोहीम काहीशी थंडावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिडकोने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्यातील यादीत सर्वाधिक म्हणजेच ४१३ बांधकामे महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. या बांधकामांवरील कारवाईसंदर्भात महापालिकेची भूमिका सुध्दा गुलदस्त्यात आहे.
सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम थंडावली
By admin | Updated: February 10, 2016 03:15 IST