पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्यांसाठी सिडकोने जाहीर केलेले पुनर्वसन पॅकेज फसवे आहे, यात प्राधिकरणाकडून मागण्यांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप चिंचपाडा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. आगामी काळात सिडकोबरोबर असहकार धोरण अवलंबिण्याचा इशारा चिंचपाड्यातील ग्रामस्थांनी दिला आहे. सिडकोला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोने डिसेंबर २0१0 सालीच पुनर्वसन पॅकेज जाहीर केले आहे. यावेळी बाधित गावातील शेतकऱ्यांनी संमतीपत्रे भरून दिली आहेत. चिंचपाडा गावातील ग्रामस्थांनीही इतर गावांचा विरोध पत्करून नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पाला पाठिंबा दिला शिवाय सर्वेक्षण करण्यासही प्राधिकरणाला सहकार्य केले. मात्र सिडकोने आश्वासन पूर्ती न केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. सिडकोने गावठाणातील घरांचे तसेच सर्व्हे नंबर जमिनीवरील घर व इतर सामाजिक प्रश्नांबाबत दुटप्पी भूमिका घेतली आहे. शिवाय पुनर्वसन पॅकेज देण्यातही भेदभाव केल्याचा आरोप परिसरातील अॅड. प्रदीप मुंडकर यांनी केला आहे. यासंदर्भात चिंचपाडा ग्रामस्थांच्या वतीने सिडकोकडे पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. उपोषण, आंदोलने, मोर्चा या मार्गाने आमच्या मागण्या प्रशासनाकडे मांडणार असल्याचे रवींद्र भोपी सांगितले. भूमिका विषद करण्याकरिता ग्रामस्थांनी मंगळवारी खास पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ग्रामस्थांनी आपली संयुक्त भूमिका मांडली. यावेळी संजय पाटील, विठ्ठल केणी, पंढरीनाथ केणी, दामोदर पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सिडकोचे पुनर्वसन पॅकेज फसवे
By admin | Updated: September 3, 2015 23:36 IST