नवी मुंबई : विदेशी डॉलरच्या बहाण्याने एकाला फसवल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.दिघा येथे राहणाऱ्या अखिलेश जयस्वाल (४०) यांची अज्ञात दोघांनी फसवणूक केली आहे. मित्रांच्या माध्यमातून ओळख झालेल्या दोघांनी त्यांना व त्यांच्या मित्रांना स्वस्तात विदेशी चलन देतो, असे सांगितले होते. यानुसार जयस्वाल व त्यांच्या साथीदारांनी अज्ञात दोघांकडून विदेशी चलन घेण्याची तयारी दर्शविली होती. याकरिता संबंधितांनी त्यांना कोपरखैरणेतील बालाजी सोसायटीलगत बोलावले होते. त्यानुसार जयस्वाल व त्यांचे सहकारी १ लाख ६८ हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी गेले होते. तिथे भेटलेल्या दोघांनी रुमालात गुंडाळलेला नोटांचा बंडल त्यांच्याकडे देऊन रक्कम घेऊन पळ काढला. मात्र रुमाल काढल्यानंतर आतमध्ये कागदाचा बंडल आढळून आला. यानुसार झालेल्या फसवणुकीची तक्रार त्यांनी कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे.शहरात यापुर्वीही अशा प्रकारे फसवणुकीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यानंतरही विदेशी चलन खरेदीच्या आमिषाला बळी पडूनही इतरही नागरिक स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत. अज्ञातांकडून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार होत असते. त्यानंतरही विदेशी डॉलरच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या जाळ्यामध्ये अनेक जण अडकत आहेत. (प्रतिनिधी)
कोपरखैरणेत विदेशी डॉलरच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Updated: December 13, 2015 00:22 IST