नवी मुंबई : स्थायी समितीने मंजूर केलेला २९३४ कोटी २९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सभापती शिवराम पाटील यांनी सर्वसाधारण सभेत सादर केला. मनोगत व्यक्त करताना आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली व त्यांनी लादलेली प्रस्तावित करवाढ रद्द केली असल्याची माहिती सभागृहास दिली. आयुक्तांनी २९९९ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. यावर सविस्तर चर्चा होऊन समितीने २९३४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मांडला. या वेळी मनोगत व्यक्त करताना शिवराम पाटील यांनी वास्तवदर्शी अर्थसंकल्प करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांनी नागरिकांवर पाणीबिल व घनकचरा कर लादण्याचा प्रयत्न केला होता. प्रस्तावित करवाढ रद्द केली आहे. मूळ अर्थसंकल्पामध्ये १११ नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील सुचविलेल्या कामांचा समावेश करण्यात आला नव्हता. सर्वसाधारण सभेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना सर्व नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना त्यांच्या प्रभागातील समस्यांची चांगली जाण असल्याने या कामांचा समावेश करण्यात आला आहे. आयुक्तांच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी शहरवासीयांवर २० वर्षे कोणतीही करवाढ न लादण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचीच अंमलबजावणी आम्हीही करून नागरिकांवर करवाढ लादली नसल्याचे स्पष्ट केले. नाईक यांचे कौतुक करताना पाटील यांनी सेनेचे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांचे नाव घेणे मात्र टाळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सभापतींनी महापौर सुधाकर सोनावणे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. या वेळी उपमहापौर अविनाश लाड, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण उपस्थित होते. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
२९३४ कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर
By admin | Updated: March 18, 2017 04:07 IST