अलिबाग : ‘अच्छे दिन’ आणण्याच्या प्रयत्नांतील सरकारच्या राज्यात बीएसएनएलची ब्रॉडबॅन्ड इंटरनेट सेवा आणि लॅन्डलाईन फोन सेवाच पूर्णपणे ठप्प झाल्यावर हे ‘अच्छे दिन’ कसे यायचे असाच प्रश्न बुधवारी सकाळपासून रायगडचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग बीएसएनएल केंद्रांतर्गत येणाऱ्या १,१७५ इंटरनेट ग्राहक व ३ हजार लॅन्डलाईन ग्राहकांना पडला आहे. संपूर्ण टेलिफोन केंद्र बंद पडले असताना येथे त्याची दुरुस्ती करुन ते पूर्ववत सुरु करण्याकरिता स्थानिक अभियंते अपयशी ठरल्याने आता पनवेल येथून अभियंते येणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मंगळवारपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा व बुधवारी सकाळपासून लॅन्ड लाइन सेवा बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत.अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे असणारे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद , जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह यांचा जिल्ह्यातील उर्वरित १४ तालुक्यांशी संपर्क तुटला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील आॅनलाइन सेवाच बंद पडल्याने जनसामान्यांची कामे होवू शकली नाहीत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या बैठकीत या समस्येचे निराकरण करण्याच्या सूचना बीएसएनएलचे अभियंता आर. बी. चव्हाण यांना जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना दिल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)
अलिबागमध्ये बीएसएनएलची सेवा ठप्प
By admin | Updated: October 28, 2015 23:28 IST