पनवेल : माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ येत असून, त्यात आता ग्रामपंचायतीही मागे नाहीत. येथील कामही गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करता आले पाहिजे, या हेतूने पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबर नेटवर्कने ब्रॉडबॅण्ड इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहेत. यासाठी रस्त्यालगत केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पनवेलमध्ये सद्यस्थितीत ९० ग्रामपंचायती असून सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ही योजना व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. नव्या नेटवर्क सुविधेमुळे ग्रामस्थांना विविध सोयी-सुविधा कमी वेळात व कमी पैशांत स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनांची माहिती या योजनेतून झटपट मिळणार आहे. ग्रामपंचायतीचा कारभार आॅनलाइन झाल्यावर विविध दाखले, माहिती नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. नेरे, माळडुंगे परिसरातही केबलसाठी खोदकाम सुरू आहे. मात्र, हे काम करताना रस्ता व साइड पट्टीचे नुकसान झाल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे काम थांबवून शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार तसेच या खात्याच्या मार्गदर्शनानुसार काम करावे, अशा सूचना बांधकाम विभागाने कंत्राटदारास दिल्या आहेत. काम न थांबविल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पेण येथील मंडळ अभियंता यांना विनापरवानगी खोदाई केल्याबाबतची नोटीस पाठवली आहे. याबाबत एनओएफएनचे विभागीय अभियंता एन. ठाकूर यांना विचारले असता, यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
ब्रॉडबॅण्डने जोडणार ग्रामपंचायती
By admin | Updated: January 11, 2017 06:38 IST