भार्इंदर : मीरा रोड येथील सृष्टी परिसरात म्हाडाने बांधलेल्या गृहसंकुलांसाठी मुंबई पालिकेने दीड एमएलडी पाणीपुरवठा देण्याचे म्हाडा प्रशासनाने मान्य केले होते. मात्र तो अद्यापही सुरू न झाल्याने मीरा-भार्इंदर पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. म्हाडाने हा पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा पालिकेने सुरू केलेला पाणीपुरवठा खंडीत करू, असा इशारा म्हाडाला दिला आहे. मीरा-भार्इंदरची लोकसंख्या १३ लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार येथे नवीन गृहसंकुले बांधण्यात येत आहेत. शहरात सुमारे पाच हजारांहून अधिक गृहसंकुले आहेत. त्यात राज्य सरकारसह म्हाडा, एमएमआरडीएच्या गृहसंकुलांची भर पडत आहे. अलीकडेच एमएमआरडीएने शहरात भाडेतत्त्वावरील सुमारे अडीच हजार सदनिकांची गृहसंकुले बांधली. त्यातील सुमारे ७५० सदनिका पालिकेला दिल्या आहेत. यातील सुमारे ३०० सदनिका बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना पालिकेने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पालिका आहे त्या सदनिकांतील रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही. असे असताना म्हाडाने मीरा रोड येथील सृष्टी परिसरात सुमारे २ हजार सदनिकांची गृहसंकुले बांधली आहेत. या गृहसंकुलांच्या बांधकामाच्या वेळीच पालिकेने शहरातील पाण्याची समस्या म्हाडा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच शहरातील नवीन गृहसंकुलांसाठी पालिकेने नवीन नळ जोडणी देण्यास २०१०पासूनच बंदी घातली आहे. त्यामुळे म्हाडाच्या गृहसंकुलांना स्वतंत्र पाणीपुरवठा सुरू व्हावा, अशी मागणी पालिकेने म्हाडाकडे केली होती. त्याला म्हाडाने मान्यता देत मुंबई पालिकेकडून दीड एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. मुंबई पालिकेनेही या पाणीपुरवठ्याला वर्षभरापूर्वीच मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी पालिकेने म्हाडाच्या गृहसंकुलांना पाणीपुरवठा सुरू करावा, असे ठरविण्यात आल होते. (प्रतिनिधी)
म्हाडा गृहसंकुलांचा पाणीपुरवठा तोडू
By admin | Updated: March 7, 2016 03:39 IST