नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस भिकाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया विक्रीसाठी राज्यातील विविध भागातून रोजगारासाठी नवी मुंबईत दाखल झालेल्या नागरिकांनी नवरात्रोत्सव संपताच शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचे पहायला मिळते. बेलापूरमधील सेक्टर १ व २ चा परिसर, वाशी रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर, नेरुळ सेक्टर ११ परिसर, पामबीच रोड या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर भिकाऱ्यांनी हक्काच्या जागा ठरवून घेतल्या आहेत.शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच भिकाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. नव्याने आलेल्या या भिकाऱ्यांनी पदपथावरील जागा अडवल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या भिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. सकाळी पदपथावर ठाण मांडून बसलेल्या भिकाऱ्यांमुळे नोकरदारवर्गाला या ठिकाणाहून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रात्रीच्या वेळी हे भिकारी दारु पिऊन धिंगाणा करत असल्याने महिलावर्गाला परिसरात वावरणेही असुरक्षित वाटते. मराठी कळते का? वडापाव खायला पैसे द्या...आमचे सामान चोरीला गेले आहे, मदत करा अशा प्रकारे नागरिकांना गंडविण्याचे प्रकार केले जातात. सीबीडी सेक्टर दोन परिसरातील बस स्थानकाला लागूनच भिकाऱ्यांनी आपले बस्तान मांडले असून या ठिकाणी बस थांब्याला मुलांचे झोके बांधले जाऊन त्याच ठिकाणी चूल पेटवतात. भिकाऱ्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यातून जाणाऱ्या महिलेची पर्स ओढणे, त्यांचे कपडे खेचणे तसेच पाय धरणे असे प्रकार सर्रासपणे पहायला मिळतात. वाहतूक पोलिसांच्या डोळ््यादेखत हे भिकारी बिनधास्तपणे वावरत असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नवी मुंबईतील भिकाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून प्रवाशांना या भिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते अशी प्रतिक्रिया शहाजी उमाप उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक पोलीस, झोन १ यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
शहराला भिकाऱ्यांचा विळखा
By admin | Updated: October 29, 2015 23:43 IST